एरवी कोणालाही सहसा न भेटणारे.. पुस्तकावर आपले नाव न लिहिणारे.. व्यक्तिगत छायाचित्रही प्रसिद्ध होणार नाही याची दक्षता घेणारे.. एकूणच गूढ व्यक्तिमत्त्वाचे आणि अलिप्ततवादी वाटणारे ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांची एम्बॉस नाममुद्रा सापडली आहे. कलाविषयक एका पुस्तकाच्या पहिल्या पानावर आणि कव्हरच्या फ्लॅपवर एम्बॉस केलेला ‘जीएं’च्या नावाचा ठळकपणाने दिसला.

ही मोलाची ठेव प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांना जीएंच्या संग्रहातील पुस्तकातून सापडली आहे. जॉन बाऊर लिखित ‘रिव्होल्यूशन अँड ट्रॅडिशन इन मॉडर्न अमेरिकन आर्ट’ या १९५१ सालच्या पुस्तकावर ही जीएंची नाममुद्रा आढळून आली आहे. आपल्या अलौकिक साहित्याने मराठी वाचकांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ कथाकार जी. ए. कुलकर्णी यांचा रविवारी स्मृतिदिन झाला. त्यामुळे आधीच गूढ वाटणाऱ्या जीएंच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू या नाममुद्रेमुळे उजेडात आला आहे.

जीएंच्या भगिनी नंदा पैठणकर यांनी रविमुकुल यांना घरी बोलावून जीएंच्या संग्रहातील कलाविषयक पुस्तके भेट देण्याची इच्छा बोलून दाखविली. ‘ही पुस्तके तुम्हालाच देण्याचे ठरविले आहे. तर, तुम्हाला ते आवडेल का,’ असेही नंदाताईंनी मला विचारले. माझे आवडते लेखक असलेल्या जीएंच्या संग्रहातील पुस्तके ही मोलाची ठेव मिळणार या आनंदात मी नंदाताईंना भेटण्यासाठी जीएंच्या घरी गेलो. त्यांनी मला देण्यासाठी म्हणून पुस्तके काढूनच ठेवली होती.

ही पुस्तके पाहत असताना ‘एकाही पुस्तकावर जीएंनी आपले नाव लिहिलेले नाही’ ही बाब माझ्या ध्यानात आली, असे रविमुकुल यांनी सांगितले. ही बाब मी औत्सुक्याने विचारली असता ‘हो, ते पुस्तकावर नाव लिहीत नसत,’ असे नंदाताईंनी मला सांगितले.

त्यानंतर मी निवडून घेतलेली ७-८ पुस्तके घेऊन घरी आलो. ‘रिव्होल्यूशन अँड ट्रॅडिशन इन मॉडर्न आर्ट’ हे पुस्तक चाळत असताना पहिल्या पानावर आणि कव्हरच्या फ्लॅपवर एम्बॉस केलेला जीएंच्या नावाचा शिक्का दिसला. नीट पाहिलं तरच दिसावं, समजावं; हा त्यांच्या एकूण लेखनाचा विशेष इथेही प्रतिमेच्याच रूपात आणि तोही स्वत:ला पडद्याआड ठेवण्याची त्यांची वृत्तीही सहजपणे आढळून आली. हा शिक्का म्हणजे जीएंची लाखमोलाची ठेव आहे, अशी भावना रविमुकुल यांनी व्यक्त केली.

ज्या लेखकाला कधी भेटता आले नाही पण, मित्राच्या वडिलांना आलेल्या पत्रांतून केवळ त्यांचे हस्ताक्षर पाहण्याचा योग आला. त्यांची नाममुद्रा ही मोठी ‘इस्टेट’ माझ्याजवळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.