पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीची ऑनलाइन नोंदणी सोमवारी सुरळीत सुरू झाली. पहिल्याच दिवशी राज्यभरातील २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यंदा प्रथमच या संकेतस्थळावर स्मार्टफोन दुरुस्तीपासून फॅशन डिझाइनिंगपर्यंतच्या १५०हून अधिक करिअरक्षेत्रांची माहिती शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
संपूर्ण राज्यात यंदा प्रथमच अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने राबविण्यात येणार आहे. त्यात ९ हजार ३३७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये एकूण २० लाख ८८ हजार २९० जागा उपलब्ध आहेत. त्यातील २ लाख १३ हजार ३५५ जागा राखीव कोट्यांतर्गत, तर १८ लाख ७४ हजार ९३५ जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी आहेत.
प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, १९ मेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात येणार होती. मात्र, पहिल्याच दिवशी संकेतस्थळ कोलमडल्याने शिक्षण विभागावर सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची वेळ आली. नोंदणी संकेतस्थळाला आलेल्या अडचणी दूर करून सोमवार, २६ मेपासून विद्यार्थी नोंदणी सुरू करण्यात आली. प्रवेश प्रक्रिया सोमवारी सुरळीत सुरू झाल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितले.
विविध करिअरक्षेत्रांची माहिती
शिक्षण विभागाने यंदा अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांसाठी विविध करिअर क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून दिली आहे. त्यात स्मार्टफोन दुरुस्ती, फॅशन डिझायनिंग, चित्रपट, विपणन, कॅलिग्राफी, रेडिओ जॉकी, कंपनी सचिव, भारतीय प्रशासकीय सेवा अशा एकूण १५० हून अधिक क्षेत्रांचा समावेश आहे. करिअर क्षेत्रे, विविध अभ्यासक्रमांची पात्रता, कामाचे स्वरूप याबाबतची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे, म्हणून करिअर क्षेत्रांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसमावेशक पद्धतीने सर्व शाखांतील करिअरसंधी देण्यात आल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थी त्यांच्या करिअरचा विचार करू शकतील. – डॉ. महेश पालकर, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक