शिरूर तालुक्यातील पाबळ येथे दरोडा घालून पसार झालेल्या चोरटय़ांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने जेरबंद केले. आठवडय़ापूर्वी पाबळमधील फुटाणवाडी येथे ही घटना घडली होती. चोरटय़ांनी केलेल्या हल्ल्यात वृद्धा मृत्युमुखी पडली होती.
चंग्या उर्फ संदेश रामलाल उर्फ रमेश काळे आणि शरद उर्फ शेऱ्या अरकाशा काळे ( दोघे रा. पारनेर, जि.नगर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. काळे हे सराईत चोरटे आहेत. १७ डिसेंबर रोजी मध्यरात्री चंग्या आणि त्याचा साथीदार शरद याने पाबळ गावातील फणसेमळा येथे अनिल महादेव पिंगळे यांच्या घरावर दरोडा घातला. या दोघा चोरटय़ांनी तीक्ष्ण शस्त्राने पिंगळे यांची सून, मुलगा आणि नातू वेदांत यांच्यावर वार केले. त्यानंतर पिंगळे यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या फुटाणवाडी येथे ठकाजी बगाटे यांच्या घरात शिरून या दोघा चोरटय़ांनी त्यांची पत्नी रखमाबाई यांच्यावर शस्त्राने वार केले. या हल्ल्यात रखमाबाई या मृत्युमुखी पडल्या होत्या. पिंगळे आणि बगाटे यांच्या घरातील ऐवज लुटून दोघे चोरटे पसार झाले. ही घटना उघडकीस आल्यानंतर शिरूर तालुक्यात घबराट उडाली.
ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या गुन्ह्य़ाचा तपास सुरू केला.पारनेरमधील काळे याने दरोडा घातल्याची माहिती हवालदार पोपट गायकवाड यांना मिळाली. सापळा रचून काळे याला पकडले. पोलीस अधीक्षक डॉ.जय जाधव यांच्या मार्गदर्शखाली पोलीस निरीक्षक राम जाधव, शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कंकाळ, सहाय्यक निरीक्षक राजेश रामाघरे, सहाय्यक फौजदार गिरीमकर, हवालदार सकाटे, मुत्तनवार,गायकवाड, राऊत, बांबळे, कुदळे, बगाडे, हेमंत गायकवाड, पोपट गायकवाड, घारे यांनी ही कामगिरी केली.