देशातील विद्यापीठांच्या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जागतिक क्रमवारीत स्थान मिळवण्यासाठी अजून मोठा पल्ला गाठावा लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे. ब्रिक्स देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत पुणे विद्यापीठ १२७ व्या क्रमांकावर आहे.
टाइम्स या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांची जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात येते. या संस्थेने ब्रिक्स देशांतील विद्यापीठांची क्रमवारी जाहीर केली आहे. ब्रिक्स राष्ट्रसमूहात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश होतो. या पाच देशांतील विद्यापीठांच्या क्रमवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला १२७ वे स्थान मिळाले आहे. या क्रमवारीत पहिल्या दोनशे विद्यापीठांत भारतातील १६ शिक्षणसंस्थांचा समावेश आहे. मात्र त्यामध्येही पुणे विद्यापीठ अकराव्या स्थानावर आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) यांबरोबरच पंजाब विद्यापीठ, जाधवपूर विद्यापीठाने पुणे विद्यापीठाला मागे टाकले आहे. जागतिक क्रमवारीत तर नाहीच पण देशांतील केंद्रीय शिक्षणसंस्था आणि इतरही काही विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ अजूनही थोडे पिछाडीवरच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून लौकिक असला, तरीही पुणे विद्यापीठाला जगातील नावाजलेल्या संस्थांच्या मांदियाळीत स्थान मिळवण्यासाठी अजूनही बराच लांबचा पल्ला गाठावा लागणार आहे.
टाइम्सनेच केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार जागतिक पातळीवर विद्यापीठाचे स्थान हे ६०० ते ८०० या क्रमांकादरम्यान आहे. अध्यापन, संशोधन, सायटेशन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, औद्योगिक क्षेत्राशी बांधिलकी अशा विविध मुद्दय़ांच्या आधारे विद्यापीठांची क्रमवारी ठरवली जाते. यातील अध्यापनाबाबत विद्यापीठ पुढे असून देशात दुसऱ्या क्रमांकावर आणि जगात १९१ व्या क्रमांकावर आहे. मात्र संशोधन आणि सायटेशन याबाबत इतर विद्यापीठांच्या तुलनेत पुणे विद्यापीठ मागे पडल्याचे दिसत आहे.