३० व्या आवृत्तीचे प्रकाशन; एक लाख प्रतींची विक्री
पुणे : कुरुक्षेत्राला भेट देऊन आवश्यक संदर्भासह वयाच्या २३ व्या वर्षी केलेल्या लेखनकर्तृत्वाला अनेक प्रकाशकांकडून नकारघंटा मिळाली. मात्र या आव्हानावर मात करत महाराष्ट्र वाल्मीकी ग. दि. माडगूळकर यांच्या सांगण्यावरून ‘मृत्युंजय’ ही साहित्यकृती वाचकांसमोर आली. ही कादंबरी पुढे जगभरात गेली. पहिल्याच साहित्यकृतीने लेखक शिवाजी सावंत यांना त्यांच्या नावाआधी ‘मृत्युंजय’कार ही उपाधी मिळवून देणारी ‘मृत्युंजय’ कादंबरी अजूनही लोकप्रियतेच्या शिखरावर असल्याची प्रचीती मंगळवारी आली.
शिवाजी सावंत यांच्या ८१ व्या जन्मदिनाचे औचित्य साधून कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे ‘मृत्युंजय’ या कादंबरीच्या तिसाव्या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. ‘मृत्युजंय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ कादंबऱ्यांच्या डिलक्स आवृत्तीचे प्रकाशनही कार्यक्रमात करण्यात आले. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, कॉन्टिनेन्टलच्या संचालिका अमृता कुलकर्णी या वेळी उपस्थित होत्या.
प्रा. जोशी म्हणाले, संघर्ष, नाटय़ आणि उपेक्षा असलेल्या व्यक्तिमत्त्वांबद्दल (पान ४ वर) (पान ३ वरून) शिवाजी सावंत यांना कुतूहल होते. त्यातून साकारलेली ‘मृत्युंजय’ ही साहित्यकृती समीक्षकांच्या चिंतनाला आव्हान देणारी आहे. ‘मृत्युंजय’नंतर ‘छावा’, ‘युगंधर’ या कादंबरी लेखनातून सावंत यांनी साहित्य शारदेचा दरबार श्रीमंत केला.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनचे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांनी प्रकाशित केलेल्या ‘मृत्युंजय’ कादंबरीच्या आतापर्यंत एक लाखाहून अधिक प्रतींची विक्री झाली असल्याची माहिती अमृता कुलकर्णी यांनी दिली.
नऊ भाषांमध्ये अनुवाद
गदिमांच्या हस्ते घरगुती पूजनानंतर ‘मृत्युंजय’ ही कादंबरी प्रकाशित झाली. पुढे जगन्मान्यता, अफाट लोकप्रियता आणि खपाचे सर्व विक्रम या कादंबरीने मोडले. या कादंबरीला अनेक मानाच्या पुरस्कारासह भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला. नोबेल पुरस्कारासाठी कोलकात्याहून १९९० मध्ये मराठीतील पहिले नामांकन ‘मृत्युंजय’ला मिळाले. हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, उडिया, मल्याळम, बंगाली, तेलगू, राजस्थानी अशा नऊ भाषांमध्ये ‘मृत्युंजय’ अनुवादित झाली आहे. आजही ही कादंबरी खपाचे विक्रम करीत आहे असे प्रा. मििलद जोशी यांनी सांगितले.