विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीची १४ ते १७ मते फुटल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. घरे फोडण्याच्या राजकारणाला दिलेला हा झटका आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी सोमवारी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव धनंजय मुंडे यांनी केला. या निकालाबाबत पत्रकारांशी बोलताना गोपीनाथ मुंडे म्हणाले की, निवडणुकीत आघाडीची १४ ते १७ मते फुटली आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या मोठय़ा प्रमाणात मते फुटल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा नैतिक पराभव झाला आहे. घोडेबाजार, फोडाफोडी आणि घरे फोडण्याच्या राजकारणालाच हा धक्का आहे. या निवडणुकीत आम्हाला मते मिळणे अवघड आहे असा दावा सत्ताधारी करत होते; पण आम्ही युतीची मते अभेद्य ठेवली आणि आघाडीचीही मते खेचून आणली.
‘बीड लोकसभा मतदार संघातील आमचा उमेदवार ठरला आहे. राष्ट्रवादीनेही त्यांचा उमेदवार जाहीर करावा. तो पवार यांच्या घरातील कोणी असेल, तर लढत अधिक रंगतदार होईल,’ असेही प्रतिपादन मुंडे यांनी केले. बीडमधून गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात लोकसभा लढवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी तयारी दर्शवली आहे, याकडे लक्ष वेधले असता त्यांनी हे उत्तर दिले. महायुतीमध्ये मनसेच्या समावेशाबद्दल विचारले असता, त्याबाबत उद्धव आणि राज हेच निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास अद्यापही लागू शकलेला नाही, हे राज्य शासनाचे अपयश आहे. पुण्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली असून चांगले अधिकारी पुण्यात येण्यास नाखूश आहेत. पुणे पोलिसांवर माझा विश्वास नसून हा तपास सीबीआयकडे द्यावा, अशीही मागणी मुंडे यांनी केली.