उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची झालेली निवड मागे घेण्यासाठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांना धमक्यांचे दूरध्वनी करणाऱ्यांचा दक्षिणायन चळवळीतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे.

दक्षिणायन चळवळीचे प्रमुख डॉ. गणेश देवी यांच्यासह ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके, कवयित्री प्रभा गणोरकर, नीरजा, प्रज्ञा दया पवार, लेखक राजन खान, राजन गवस, अभय कांता, प्रमोद मुनघाटे आणि संदेश भंडारे यांनी एका पत्रकाद्वारे या प्रवृत्तीचा निषेध करताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे मराठीतील केवळ एक लेखक नसून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सातत्याने क्रियाशील असलेले कार्यकर्ते आहेत. दीर्घकाळपासून विविध विषयांवर लेखन करणाऱ्या फादर दिब्रिटो यांना ‘सुबोध बायबल-नवा करार’ या त्यांनी केलेल्या बायबलच्या मराठी भाषांतरासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व अस्सल मराठमोळे आहे. ते कॅथॉलिकपंथीय ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून ओळखले जात असले, तरी त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला. ज्येष्ठ मराठी साहित्यिक याबरोबरच पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठविणारे कार्यकर्ते, सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची खरी ओळखही आहे.  समाजासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना दिब्रिटो यांनी नेहमीच कृतिशील पाठिंबा दिला आहे. सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि धार्मिक अशा विविध प्रकारच्या उपक्रमांतून त्यांनी स्वत:ला समाजाशी जोडून घेत वेळोवेळी आपल्या ‘समाजधर्मा’चेही पालन केले आहे.  त्यांच्या निवडीबद्दल पदाधिकाऱ्यांना धमक्या दणे अतिशय निंदनीय गोष्ट आहे, असे या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

‘आम्ही त्यांच्या पाठीशी’

मराठी भाषेतील साहित्याला धर्म आणि जातीचे कुंपण कधीच नव्हते. संतकाव्यापासून  मुस्लीम, ख्रिश्चन आणि अठरापगड जातीच्या कवींनी मराठी साहित्याला समृद्ध केले आहे. अनेक ख्रिश्चन लेखक, संशोधक आणि भाषांतरकारांनी प्राचीन आणि आधुनिक मराठी साहित्याला सातासमुद्रापलीकडे नेले आहे. १८५७ साली मराठी आणि भारतीय भाषेतील पहिली कादंबरी लिहिणारे बाबा पद्मनजी हे सुद्धा फादर दिब्रिटो यांच्याप्रमाणेच धर्मप्रसारक होते, हे लक्षात घेतले पाहिजे. उदारमतवादी, सहिष्णू आणि भारताची बहुसांस्कृतिक घडण लक्षात न घेता केवळ धर्म आणि पंथ यांचा विचार करून मराठी भाषा आणि साहित्याला दुराभिमानाच्या मर्यादा घालू पाहणारे मुठभर कट्टरतावादी लोकांच्या धमक्यांना भीक न घालता मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलन उत्साहाने आयोजित करावे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे आवाहन डॉ. गणेश देवी यांनी केले आहे.