उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांमधील प्रवाशांचे हाल; अनारक्षित डब्यांसाठी क्षमतेहून अधिक तिकीट विक्री
पुणे रेल्वे स्थानकावर प्रामुख्याने उत्तरेकडे जाणाऱ्या गाडय़ांच्या अनारक्षित डब्यांमध्ये प्रथम येणाऱ्या प्रवाशाला प्रथम प्रवेश देण्यासाठी नुकतीच टोकन पद्धत सुरू करण्यात आली आहे. मात्र, अनारक्षित डब्यांसाठी अद्यापही बेसुमार व क्षमतेपेक्षा तीन ते चारपट तिकिटांची विक्री केली जात आहे. त्यामुळे अनारक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांचे हाल थांबलेले नाहीत.
उत्तरेकडे जाणाऱ्या सर्वच गाडय़ांतील अनारक्षित डब्यांमध्ये प्रवाशांना जागा मिळत नाही. जागेवरून अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. काही वेळेला प्रवाशांमध्ये मारामारीही होत असते. हा प्रकार टाळण्यासाठी प्रवासाचे तिकीट घेऊन येणाऱ्याला त्याच्या येण्याच्या वेळेनुसार टोकन देण्याची पद्धत पुणे रेल्वे स्थानकात आठवडय़ापूर्वी सुरू करण्यात आली आहे. टोकनच्या क्रमांकानुसार प्रवाशाला अनारक्षित डब्यामध्ये प्रवेश देण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत असला, तरी मूळ प्रश्न कायमच असल्याचे वास्तव आहे. अनारक्षित डब्यांमध्ये दंडेलशाही करून जागा मिळवायची व नंतर प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना ती जागा देण्याचा उद्योग काही मंडळींकडून करण्यात येत आहे. टोकनच्या पद्धतीमुळे या प्रकाराला आळा बसणार आहे. मात्र, त्यामुळे अनारक्षित डब्यांमध्ये सर्वाना बसण्यास जागा उपलब्ध होणार नाही. एका डब्याची क्षमता नव्वद प्रवाशांची असते. मात्र, रेल्वेकडून दोनशेहून अधिक जणांना तिकिटे दिली जातात. त्यामुळे अनारक्षित डब्यामध्ये कधीकधी पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. टोकन पद्धत सुरू केली असली, तरी बेसुमार तिकीट विक्री थांबलेली नाही. त्यामुळे अनारक्षित डब्यातील प्रवाशांची मूळ समस्या सुटलेली नाही. ही समस्या सोडविण्यासाठी आसन क्षमतेनुसार तिकिटांची विक्री व्हावी व गाडय़ांमध्ये अनारक्षित डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.