पिंपरी चिंचवडमध्ये एका तीन वर्षीय मुलीवर नातेवाईक असणाऱ्या १९ वर्षीय मुलाकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी तरुणाला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील चिखलीत ही घटना घडली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी हा मुळचा उत्तर प्रदेशचा राहणारा आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित मुलीचा परिवार आणि आरोपी यांच्यात घरगुती संबंध होते. ते अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. विशेष म्हणजे आरोपीला मुलीच्या वडिलांनी कामासाठी पुण्यात आणले होते. तो येथे भंगार गोळा करण्याच काम करतो.

आरोपीने गुरुवारी मुलीला खेळण्याच्या बहाण्याने सायकलवरून त्याच्या घरी नेले. याठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीची तब्येत अचानक बिघडल्याने तिला आई-वडिलांनी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा ही बाब समोर आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.