परसबाग करताना काही लोकांना केवळ जमिनीची उपलब्धता असते तर काहींना केवळ गच्ची व बाल्कनीची; पण बंगल्यात बाग करताना दोन्हींची मुबलक उपलब्धता म्हणजे दुहेरी आव्हान. पण हे आव्हान अंजलीताई लेले यांनी लिलया पेलले आहे. ढोबळमानाने वनस्पती तीन प्रकारच्या वातावरणात स्वत:ला सामावून घेतात. १) मेसोफाईट- पाणी, जमीन व मध्यम प्रकाश, २) हायड्रोफाईट- पाणथळ जागा वा पाण्यात वाढणाऱ्या, ३) झेरोफाईट- उष्ण हवा, वाळवंटात वाढणाऱ्या, बंगल्याच्या चारी बाजूंना या प्रकारचे वातावरण, प्रकाशाच्या उपलब्धतेनुसार असते. त्यामुळे त्या त्या जागी तशी झाडे निवडली व अधिकाधिक जैवविविधता जपली असे त्या सांगतात. वनस्पतिशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्याने वनस्पतींच्या अंतर्बाह्य़ जगाचे ज्ञान ही त्यांची जमेची बाजू. वनस्पतींच्या गरजा जाणून त्यांची निगा राखणे ही खासियत नियोजन करताना वेगेवगळ्या हवामानातील वनस्पतींना आवडीच्या अधिवासानुसार जागा दिल्या आहेत. पूर्व-पश्चिमेस उन्हाची उपलब्धता भरपूर तेथे कायमस्वरुपी झाडे, ऊन आवडणारे गुलाब आहेत. उत्तर-दक्षिणेस अयनाप्रमाणे प्रकाश कमी-जास्त होतो अशा ठिकाणी त्या कुंडय़ा बदलत राहतात.

दर्शनी भागातील कुंपणाच्या जाळीवर विलोभनीय रंगातील बोगनवेलीचा बहरलेला वेल. दारात सुगंधी अनंत, एका बाजूच्या कुंपणाच्या भिंतीवर अर्धगोलाकार कुंडय़ांमध्ये ऋतुमानानुसार फुलणारे पिटुनिया, पोर्टुलाक्का, फ्लॉक्स, व्हर्बिना, नेटेरियमसारखी रंगांची उधळण करणारी फुले, बंगल्यासमोर फरशांमध्ये हिरवळ लावून केलेली सुरेख रचना, त्यामागे मातीच्या, टेराकोटाच्या सुबक कुंडय़ांमध्ये अ‍ॅन्थुरीयम, पीस लिली, फर्नस आहेत. सर्व कुंडय़ा एकाच पातळीवर न ठेवता वेगवेगळ्या उंचीवर त्यांची रचना तसेच वेगवेगळ्या उंचीच्या व आकाराच्या कुंडय़ांमुळे झाडाचे सुरेख कोलाज तयार झाले आहे. प्लॉटवरील जुन्या भल्या मोठय़ा झाडाच्या सावलीत थोडे ऊन मिळेल अशा ठिकाणी केलॅडियम, कोलीयस साँग ऑफ इंडिया, पेंटास आहेत. ‘फुले छान दिसतातच पण त्याचे आयुष्य थोडे पण शोभिवंत पानांच्या वनस्पतीमुळे बाग नेहमी छान दिसते,’ असे अंजलीताई सांगतात. त्यांच्या प्लॉटची रचना उताराची आहे. याचा उपयोग करून पायऱ्यांवरही शोभिवंत पानाच्या कुंडय़ा ठेवल्या आहेत. भिंतीलगत ऊनसावलीच्या, सूर्यप्रकाश झिरपणाऱ्या जागेत विविध ठिकाणांहून आणलेल्या देखण्या, नखरेल ऑर्किडसची तजबीज केली आहे. तिथेच नागवेलीच्या पानाच्या वेलीने भिंतीच्या आधाराने चांगलेच बस्तान बसवले आहे. त्याने पूर्ण ‘ग्रीन वॉल’ केली आहे पण त्यामुळे सरपटाचा धोका वाटतो म्हणून त्याची छाटणी करायचा विचारही त्यांनी बोलून दाखवला.

Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर

मागच्या बाजूला एका कोपऱ्यात फुलांनी बहरलेला हादगा, तर दुसऱ्या वाफ्यात केळी, आळू अशी पाणी आवडणारी झाडे फोफावली आहेत.

वनस्पतिशास्त्र शिकताना कीटक विश्वाची माहिती झाली, त्यांचे निसर्गातले स्थान किती महत्त्वाचे आहे हे ओळखून अंजलीताईंनी मधमाशीपालन केले. पाना-फुलांबरोबरच पक्षी, फुलपाखरे यांना पोषक वातावरण त्यांच्या बागेत बघायला मिळते. पपई, शेवगा, लिंबू, तूती अशी मोठी झाडे तर आहेतच, पण विविध रंगांचे ग्लॅडेओलस, डेलियाही आहेत. वाळा, गवती चहा असा आजीबाईंचा बटवा आहे. निसर्गावर प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती मानवनिर्मित कचऱ्याचे ढीग पाहून कचऱ्यामुळे निसर्गाची होणारी हानी पाहून व्यथित होते. वीस वर्षांपूर्वी अंजलीताईसुद्धा वाहणाऱ्या कचराकुंडय़ा पाहून उद्विग्न झाल्या, पण त्यांनी त्यावर उपाय शोधला. त्या इनोरा संस्थेत पोचल्या, स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती शिकल्या. त्यांना तिथे अनेक परसबाग वेडय़ा मैत्रिणी भेटल्या. इनोराच्या विश्वस्त मंजुश्री तडवळकर, नूतन भाजेकर, अनुराधा गानू, नीला खरे, सुधा थिटे, कल्पना देशपांडे, ललिता ओक, मधुमती साठे, वीणा गोडबोले हा कृतिशील गट. परसबाग विषयक, कचराव्यवस्थापन विषयक मार्गदर्शन, विचारांचे अनुभवांचे, रोपांचे बियांचे आदान प्रदान ‘इनोरा गार्डन क्लब’मध्ये गेली तीन दशके सातत्याने होते. बागांना भेटी, व्याख्याने आयोजित केली जातात. यामध्ये अंजलीताईंचा सक्रिय सहभाग असे. आजही त्या कचरा व्यवस्थापनासाठी उत्साहाने कार्यशाळा घेतात. बागेत नवनवीन प्रयोग करतात. या वर्षी तीळ, कारळे लावले अन् नवरात्रीत पिवळ्या धमक फुलांनी बाग बहरून गेली, असे उत्साहात त्या सांगतात.

शास्त्रीय शिक्षण व तीस वर्षांहून अधिक परसबागेचा दांडगा अनुभव यावर आधारित ‘बहरलेल्या बागेचे तंत्र आणि मंत्र’ हे देखणे पुस्तक लिहिले आहे. त्यांच्या सौंदर्यदृष्टीचे अन् राजस स्वभावाचे प्रतिबिंब त्यांच्या बागेत ठिकठिकाणी पडलेले दिसते, तेच त्यांच्या पुस्तकातही उमटले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सासरच्या वाराणसीच्या भल्या मोठय़ा आवारातील वयोवृद्ध कष्टकरी माळीबुवांकडून खूप शिकता आले, हे ऋण त्या आजही जाणून आहेत. थंडीत पाचोळ्याच्या खतापासून शेवंती, सिमरारिया, स्वीट पीज फुलवण्यात त्यांचा हातखंडा होता हे त्या विसरल्या नाहीत.

छंद जोपासण्यासाठी झालेले घरच्यांचे सहकार्य जाणतात. ‘बहरलेल्या बागेसाठी झाडांची निवड अत्यंत महत्त्वाची,’ असा मोलाचा सल्ला देतात. आपण निसर्गाचे निव्वळ एक घटक आहेत हे जाणून अंजलीताईंनी त्यांचे पुस्तक ऊन, माती, पाऊस या साध्या सरळ गोष्टींपासून अन्न निर्माण करणाऱ्या व समस्त प्राणीजगताचे पोषण करणाऱ्या वनस्पती जगतास अर्पण केले आहे, हे त्यांच्या राजसवृत्तीस साजेसेच आहे.

प्रिया भिडे

(सदस्य, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी)