सलग सुट्टय़ांमुळे वर्षांविहारासाठी पर्यटक लोणावळ्यात

लोणावळा : स्वातंत्र्यदिनाला जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरात शनिवारी पर्यटक मोठय़ा संख्यने दाखल झाले. पर्यटनबंदीचे आदेश कायम असताना लोणावळा परिसरात पुणे-मुंबईतील पर्यटकांनी वर्षांविहारासाठी गर्दी केली आहे. करोनाच्या संसर्गामुळे पर्यटनबंदीचे आदेश लागू आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांकडे निघालेल्या पर्यटकांची वाहने पोलिसांनी नाकाबंदी करून परत पाठविली.

स्वातंत्र्यदिनापासून निर्बंध आणखी शिथिल करण्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यंदा स्वातंत्र्यदिन रविवारी (१५ ऑगस्ट) आहे. शनिवारी खासगी तसेच शासकीय कार्यालयांना सुट्टी असते. सोमवारी (१६ ऑगस्ट) पारशी नववर्षांमुळे (पतेती) सुट्टी आल्याने वर्षांविहारासाठी मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. स्वातंत्र्यदिनापासून निर्बंध आणखी शिथिल करण्यात येणार असले, तरी ग्रामीण भागातील करोना संसर्ग कायम असल्याने पर्यटनबंदीचे जुनेच आदेश लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जाहीर केले आहे.

पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई असली, तरी लोणावळा, खंडाळा परिसारतील हॉटेलमध्ये राहण्यास परवानगी असल्याने पर्यटकांनी हॉटेल, रिसोर्ट, बंगल्यांची निवासासाठी आगाऊ नोंदणी केली होती. त्यामुळे शनिवारी मोठय़ा संख्येने पर्यटक लोणावळा, खंडाळा परिसरात दाखल झाले. त्यामुळे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. भुशी धरण, लायन्स पॉइंट, शिवलिंग पॉइंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोणावळा पोलिसांनी नाकाबंदी करून पर्यटकांना पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई केली. पर्यटकांची वाहने परत पाठविण्यात आली. लोणावळा शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक दिलीप पवार, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मावळ तालुक्यातील कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, पवना धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर शनिवारी सकाळपासून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. ग्रामीण पोलीस मुख्यालयातून अतिरिक्त कुमक मागविण्यात आली असून पुढील तीन दिवस लोणावळा, खंडाळा परिसरात बंदोबस्त राहणार आहे. पर्यटकांनी करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नियमावलीचे पालन करावे तसेच पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.