स्थानिक संस्था कराच्या (लोकल बॉडी टॅक्स – एलबीटी) विरोधात सुरू केलेले आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी मंगळवारी व्यापारी संघटनांतर्फे महारॅलीचे आयोजन करण्यात आले असून व्यापाऱ्यांचे कुटुंबीय या रॅलीत सहभागी होणार आहेत. महाराणा प्रताप उद्यान ते नदीपात्रालगतचे मैदान या दरम्यान ही रॅली होईल.
एलबीटीच्या विरोधात सुरू करण्यात आलेल्या बेमुदत बंदमध्ये पुणे व्यापारी महासंघातर्फे रोज विविध कार्यक्रम केले जात असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोमवारी व्यापारी संघटनांतर्फे श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शहरात ऐंशी ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आला. अक्षयतृतीया ही व्यापारासाठीची मोठी संधी असताना देखील सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह सर्व बाजारपेठा सोमवारी कडकडीत बंद ठेवण्यात आल्या. त्यातूनच एलबीटीच्या विरोधात व्यापाऱ्यांची किती तीव्र भावना आहे ते लक्षात येते, असे महासंघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.
कुटुंबीयांची महारॅली
 एलबीटीच्या विरोधात मंगळवारी (१४ मे) सकाळी नऊ वाजता महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बाजीराव रस्त्यावरील महाराणाप्रताप उद्यानापासून ही रॅली सुरू होईल. व्यापारी या रॅलीमध्ये कुटुंबीयांसह सहभागी होणार आहेत. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, केळकर रस्ता या मार्गे जाणाऱ्या या रॅलीची सांगता भिडे पुलाजवळील नदीपात्रालगतच्या मैदानात होईल. तेथे जाहीर सभा होणार असल्याचे संघटनेचे सचिव महेंद्र पितळीया यांनी सांगितले.