सध्या लग्नसराईच्या दिवसांत मंगल कार्यालये किंवा लॉन्समुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या कार्यालयांच्या आवारात वाहनांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे रस्त्यांवर पार्किंगच्या दोन-तीन रांगा उभ्या राहात आहेत.
पुण्यातील अनेक रस्त्यांवर पुणेकरांना सध्या वाहतूक कोंडी अनुभवाला येत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये जवळजवळ मंगल कार्यालये किंवा पार्टी लॉन्स आहेत. त्यामुळे सध्या लग्नसराईच्या काळात या रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. शहरातील अनेक भागांमध्ये हीच समस्या दिसत आहे. या मंगल कार्यालयांच्या आवारामध्ये वाहने उभी कऱ्ण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी केली जातात. एकाच ठिकाणी बरीच मंगल कार्यालये किंवा पार्टी लॉन्स असल्यामुळे मुळातच रस्त्यावर गर्दी असते, त्यात दोन-तीन रांगांमध्ये उभ्या केलेल्या गाडय़ांची भर पडते.
सिंहगड रस्त्याला समांतर असणारा म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यावर एकमेकाला लागून पार्टी लॉन्स आहेत. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दोन-तीन रांगांमध्ये वाहने उभी केलेली असतात. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकींच्या साधारण दोन रांगा आणि त्यापुढे चारचाकी वाहनांच्या दोन रांगा अशी परिस्थिती दिसून येते. त्यातून वाचलेल्या रस्त्यावर वराती, बँड पथके आणि फटाक्यांची आतषबाजी असते. त्यामुळे रस्त्यावर एखादे दुचाकी वाहन व्यवस्थित जाऊ शकेल अशी परिस्थिती बहुेतेक वेळा नसते. या रस्त्यावर तारखेनुसार वाहने उभी करण्याचाही नियम नाही. त्यामुळे जागा मिळेल तेथे चारचाकी गाडय़ा उभ्या असतात.
जो प्रकार डी.पी. रोड येथील आहे, तोच प्रकार आपटे रस्त्यावरही दिसून येतो. फग्र्युसन रस्ता आणि जंगली महाराज रस्ता एकेरी करण्यात आल्यापासून या दोन्हीच्यामध्ये असलेल्या आपटे रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून विचार केला जातो. त्यामुळे मुळातच या रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. या रस्त्यावरही अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे लग्नाचा मुहूर्त असला, की वाहतूक कोंडी निश्तितच! शहराच्या मध्यवर्ती भागातील पेठांमध्येही मंगल कार्यालये आहेत. मात्र, या कार्यालयांमध्ये वाहने उभी करण्यासाठी वाहनतळांची व्यवस्था नाही. त्यामुळे कार्यक्रमासाठी शेकडोने येणाऱ्या नागरिकांनाही गाडय़ा रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. मुळात अरूंद असणाऱ्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर किंवा गल्लीबोळांमध्ये चारचाकी गाडय़ा उभ्या राहिल्या की रस्ता जवळपास बंदच होऊन जातो. धायरी भागातील रस्ता, कोथरूड येथील डि. पी. रस्ता या ठिकाणीही  हीच समस्या दिसून येते. याबाबत क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी वाहतूक विभागाला निवेदन दिले आहे.