पोलिसांची शाळा, महाविद्यालय, रुग्णालय व्यवस्थापनाबरोबर बैठक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील मोठी रुग्णालये, शाळा, मंगल कार्यालये, मॉलच्या परिसरात सम-विषम दिनांक न पाहता लावण्यात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा होतो. बेशिस्त वाहनचालकांमुळे या भागातील कोंडीत भर पडत आहे. या पाश्र्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील मोठी रुग्णालये, शाळा, मॉल, मंगलकार्यालयाचे व्यवस्थापक आणि शिकवणी चालकांची बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिल्या. सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा झाल्यास संबंधित व्यावसायिक तसेच संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहरातील अनेक मोठी रुग्णालये, मॉल, उपाहारगृहे, शाळांच्या बाहेर बेशिस्तीने वाहने लावली जातात. त्यामुळे या भागात नियमित कोंडी होत असल्याचे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बैठकीत संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले. काही रुग्णालयांच्या बाहेर रस्त्यांवर दुतर्फा दुचाकी आणि मोटारी लावल्या जातात. तेथे झालेल्या कोंडीमुळे रुग्णवाहिकांना देखील रुग्णालयात प्रवेश करताना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे गंभीर अवस्थेतील रुग्णाच्या जीवितीला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तातडीने वैद्यकीय उपचार सुरु केल्यास रुग्णाचा जीव वाचतो, असे पोलीस उपायुक्त सातपुते यांनी सांगितले.

सार्वजनिक रस्त्यावर सम-विषम दिनांक न पाहता बेशिस्तपणे वाहने लावण्यात आल्याने कोंडी होते. त्यामुळे वाहतुकीला कोंडी निर्माण झाल्यास संबंधित आस्थापनांच्या चालकांना यापुढील काळात जबाबदार धरुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस उपायुक्त सातपुते यांनी दिला.

अनेक ठिकाणी कोंडी, बेशिस्त

  • मध्यभागातील बहुतांश शाळांबाहेर नियमित कोंडी
  • डीपी रस्त्यावर मंगल कार्यालयांसमोर बेशिस्त वाहने लावण्याचे वाढते प्रकार
  • बाजीराव रस्ता नातूबाग परिसरात शिकवण्यांच्या बाहेर दुचाकींचा वेढा
  • शहरातील बहुंताश रुग्णालये, मॉलच्या परिसरात दुचाकी, चारचाकी वाहने

स्वयंसेवक नेमण्याची सूचना

शहरातील शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी, रुग्णालये, मॉल तसेच उपाहारगृहांमध्ये येणाऱ्या नागरिकांना वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधितांची आहे. व्यवस्थापनाने सार्वजनिक रस्त्यावर कोंडी होणार नाही, याची काळजी घेणेही आवश्यक आहे. अनेक शाळा, महाविद्यालय, खासगी शिकवणी तसेच रुग्णालयांच्या परिसरातील बेशिस्त पद्धतीने लावलेल्या वाहनांवर कारवाईची गरज आहे.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Traffic jam in pune
First published on: 20-11-2018 at 01:14 IST