शहरात रस्त्यांपेक्षा वाहने जास्त, बेशिस्त वाहनचालक, त्यांना पोलिसांचा धाक नाही, रस्त्यावरती सुरू असलेली कामे आणि लहान रस्ते यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाहतुकीमध्ये सुधारणा करायची असेल, तर विविध भागात उड्डाण पूल करावे, जास्त बसची व्यवस्था करावी, भुयारी मेट्रो असावी, या उपाययोजना कराव्या लागतील. तसेच वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी जास्त दंड, रस्त्यावर जास्त पोलीस, बेशिस्त वाहनचालकांचा परवाना रद्द करावा लागेल.
शहरातील वाहतुकीबाबतचे हे मत खुद्द पुणेकरांनीच व्यक्त केले असून त्यावर त्यांनीच हे उपाय सुचवले आहेत. ‘मंत्रा रिसर्च’ या पुण्यातील मार्केटिंग संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीने शहरातील गर्दीच्या सर्व रस्त्यावर ‘पुण्याची वाहतूक व्यवस्था’ याबद्दल काय वाटते याबाबत सर्वेक्षण केले. यामध्ये पादचारी, सायकलस्वार, दुचाकी, चारचाकी चालक, बस, रिक्षा अशा शहरातील साडेसाहशे नागरिकांशी संवाद साधून वाहतुकीचा अहवाल तयार केला आहे. या अहवालाची माहिती मंत्रा रिसर्च हे संचालक शिरीष फडतरे आणि मेधा ताडपत्रीकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा अहवाल पुणे महापालिकेला आणि पोलिसांना दिला जाणार असल्याचे फडतरे यांनी सांगितले.
प्रवास करताना भेडसावणाऱ्या समस्या
शहरात प्रवास करताना नागरिकांना कोणत्या समस्या भेडसावतात. याबाबत प्रश्नावली तयार करून नागरिकांना विचारण्यात आले. त्यानुसार वाहतूक कोंडी ही मोठी समस्या असल्याचे मत ७५ टक्के नागरिकांनी नोंदविले. त्यानंतर बेशिस्त वाहनचालक, रस्त्यावर पार्किंग केलेली वाहने, चालण्यास फुटपाथ नाही, सिग्नल तोडून मध्येच येणारे वाहनचालक, रस्ता ओलांडताना अडचण या समस्या येत असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले.
५८ टक्के पुणेकरांची कबुली
शहरात वाहनचालकांना तुम्ही नियम मोडला का? अशा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या वेळी ५८ टक्के पुणेकरांनी वाहतुकीचे नियम तोडल्याची कबुली दिली आहे. त्यात वाहन चालविताना मोबाइलचा वापर, सिग्नल तोडणे, नो एंट्री मधून जाणे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी थांबवणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
वाहतुकीला शिस्त लावावी यासाठी जास्त रकमेचा दंड वसूल करावा असे सर्वाधिक (४९ टक्के) नागरिकांनी म्हटले आहे. त्यानंतर रस्त्यावर जास्त पोलीस ठेवा, नियम तोडल्यास परवाना रद्द करावा, सीसीटीव्ही कॅमेऱ्याने लक्ष ठेवा, लहान मुलांना वाहतुकीबाबत प्रशिक्षण द्या असे उपाय सुचविण्यात आले आहेत.

वाहतूक परिस्थितीबाबत नागरिकांचे मत
पर्याय                                           नागरिकांच्या मतांची टक्केवारी
रस्त्यापेक्षा वाहने जास्त आहेत                            ८०.००
उतावीळ, बेशिस्त वाहन चालक                            ७९.५६
पोलिसांचा धाक नाही                                           ७८.२३
रस्त्यावरची कामे                                                 ७७.३७
सार्वजनिक वाहने योग्य नाहीत                            ७७.०८
बीआरटीचा वापर नाही/ रस्ते वापरता येत नाहीत    ६५.८४
लहान रस्ते                                                           ६३.२३
ट्रॅफिक सिग्नल एकमेकांना सिंक्रोनाइज नाहीत     ६०.००

वाहतूक सुधारणा उपाय :
पर्याय                                 नागरिकांच्या मताची टक्केवारी
विविध भागात उड्डाण पूल        ५२.३१
जास्त व स्वस्त पार्किंगची सोय   ४९.८२
जास्त बसेस                               ३५.६०
भुयारी मेट्रो                                २४.८०
प्री पेड अॅटो                                २२.१९
जमिनीवरीची मेट्रो                     १८.२०
पादचारी मार्ग                            १८.११
इतर                                        १६.८५

रेंगाळणाऱ्या कामांना / प्रकल्पांना जबाबदार कोण?
    पर्याय                              नागरिकांच्या मताची टक्केवारी
पुणे महानगरपालिका                        ६९.६९
राज्य सरकार                                     १४.००
केंद्र सरकार                                      ०५.०८
विरोध करणारे स्थानिक नागरिक       ०४.७७
विरोध करणारे एनजीओ                      ०२.९२