वाहतूक पोलिसांकडून ‘पीएमसी’ कायद्याचा वापर सुरू

राहुल खळदकर, पुणे</strong>

पुण्यातील बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कठोर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. वाहतुकीचे नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना जरब बसविण्यासाठी नियमभंगाचे खटले दाखल असलेल्या वाहनचालकांनी पारपत्र तसेच चारित्र्यपडताळणीसाठी अर्ज केल्यास तेथे त्यांना अटकाव घालण्याबाबत पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच निर्बंध घातलेल्या रस्त्यांवर सर्रास नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी महापालिका कायद्याचा २००३ (पीएमसी अ‍ॅक्ट) वापर करण्यास सुरुवात केली आहे.

या कायद्यात नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांकडून जादा दंड आकारण्याची तरतूद आहे. मोटार वाहन कायद्याच्या तुलनेत पीएमसी कायद्याचा वापर करून कारवाई केल्यास वाहनचालकांना निश्चितच जरब बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी पीएमसी कायद्याचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत (एमव्ही अ‍ॅक्ट) कारवाई करण्यात येते. मोटार वाहन कायद्यात दंडाची रक्कम कमी आहे. समजा, एखाद्या दुचाकीस्वाराने पदपथावर वाहन लावले तर वाहतूक पोलिसांकडून दोनशे रुपये दंड आकारण्यात येतो. पण अशा प्रकारच्या  नियमभंगासाठी पीएमसी कायद्याचा आधार घेऊन कारवाई केल्यास त्या वाहनचालकाकडून एक हजार रुपये दंड आकारण्यात येतो. मोटार वाहन कायद्याच्या तुलनेत पीएमसी कायद्यात मोठय़ा दंडाची तरतूद आहे, अशीही माहिती सातपुते यांनी दिली.

शहरातील काही  प्रमुख रस्त्यांवर विशिष्ट वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. समजा, एखाद्या अवजड वाहनाने नियमभंग केल्यास त्याच्याकडून एरवी आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेपेक्षा जादा दंड आकारण्याची तरतूद पीएमसी कायद्यात आहे. पोलिसांकडून या कायद्याचा वापर यापूर्वी करण्यात आला आहे. मात्र, गेल्या महिन्याभरापासून या कायद्याचा वापर प्रभावीपणे करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सम-विषम दिनांक विचारात न घेता एखाद्याने रस्त्यावर दुचाकी लावल्यास त्याच्याकडून पीएमसी कायद्यांतर्गत एक हजार रुपये दंड तसेच मोटारचालकाकडून दोन हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

पीएमसी कायद्याचा वापर

महापालिकेने ज्या रस्त्यांवर अवजड वाहतुकीला निर्बंध घातले आहेत, त्या रस्त्यांवर नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करणे पीएमसी कायद्यानुसार शक्य होते. तसेच पदपथांवर वाहने लावल्यास देखील या कायद्यानुसार कारवाई करता येते. या कायद्यातील तरतुदीनुसार सम-विषम दिनांकांचा नियम डावलून वाहने उभी करणाऱ्यांवरही या कायद्याने दंड करता येतो.

पीएमसी कायद्याची निर्मिती २००३ मध्ये करण्यात आली आहे. या कायद्यान्वये महापालिकांकडून वाहतूक पोलिसांना काही अधिकार बहाल करण्यात आले आहेत. या कायद्याचा वापर करून पोलीस कारवाई करू शकतात. मोटार वाहन कायद्याबरोबरच पीएमसी कायद्याचा प्रभावी वापर केल्यास बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लागण्यास मदत होईल.

– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा