कोकणातील सावंतवाडी म्हणजे गंजिफा, लाकडी खेळणी यांच्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर. पण याच सावंतवाडीत आणखीही एक वैशिष्टय़पूर्ण कला होती, ती म्हणजे लाकडी शिल्प बनवण्याची कला! ती अगदी साठ-सत्तर वर्षांपूर्वीपर्यंत जिवंत होती, आता तिथून लोप पावली आहे. मात्र, तिच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न होत असून, त्यात पुण्याचाही सहभाग आहे. त्याचाच एक भाग म्हणून पु.ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या पुण्यातील औंध येथील दालनात या कलेशी संबंधित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी सावंतवाडी येथील पाच कलाकारांची निवड करण्यात आली असून, त्यासाठी त्यांना विशेष विशेष प्रशक्षण देण्यात येणार आहे. ही कला सध्या कर्नाटकमध्ये हंपीजवळील किन्नाळ येथील काही कलाकारांनी जिवंत ठेवली आहे. त्यांच्याकडून ती सावंतवाडी येथे पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ‘किन्नाळ हस्तकले’मध्ये लाकूड, चिंचोक्याची पूड आणि कापड यांचा एकत्रित वापर करून देवतांच्या मूर्ती व इतर वस्तू तयार केल्या जातात. अशाच प्रकारची कला सावंतवाडी येथेसुद्धा अस्तित्वात होती. त्यांच्या मूर्ती दिसायला भिन्न असल्या, तरी त्या तयार करण्याच्या तंत्रात मात्र बरेच साम्य आहे. त्यामुळे त्यांच्याच काही संबंध होता का, याचा शोध घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर या कलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी सावंतवाडी संस्थान, पु.ना. गाडगीळ अॅन्ड सन्स आणि किलोस्कर फेरस इंडस्ट्रिज यांनी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमाचे प्रमुख राजू सुतार यांनी सांगितले, की ही कला सावंतवाडी येथे तब्बल साडेतीनशे चारशे वर्षांपासून अस्तित्वात होती. तशीच ती कर्नाटकमध्ये किन्नाळ येथेसुद्धा असल्याचे अलीकडेच माहीत झाले. सावंतवाडी येथे या वस्तूंना पुरेशी बाजारपेठ न मिळाल्याने ती नामशेष झाली. मात्र, किन्नाळ येथे सहा कुटुंबांमध्ये ती आजही अस्तित्वात आहे. तिच्या पुनरुज्जीवनासाठी सावंतवाडी येथील पाच कलाकारांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांना बडोदा संस्थानचे हेरिटेज कला तज्ज्ञ चंद्रशेखर पाटील हे प्रशिक्षण देणार आहेत. ही कला जिवंत राखण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत.

पुण्यात प्रदर्शन
या कलेशी संबंधित वस्तूंचे प्रदर्शन पु.ना. गाडगीळ अॅन्ड सन्स यांच्या औंध येथील दालनात भरवण्यात आले आहे. ते १८ मेपर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या काळात सर्वासाठी खुले असेल. त्यात अशा प्रकारच्या १९ वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अजित गाडगीळ यांनी दिली.