औंध जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची चौकशी करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आदेश व त्यानुसार, पिंपरी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यामार्फत चौकशीचे काम सुरू असतानाच रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनायक मोरे यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्याशी झालेल्या वादविवादानंतर मोरे यांची बदली झाली. अजितदादा व जगतापांच्या राजकीय दबावामुळेच मोरे यांना बदलीला सामोरे जावे लागल्याचे मानले जाते.
औंध रुग्णालयाच्या कारभाराचा मुद्दा आमदार जगताप यांनी उपस्थित केल्यानंतर डॉ. मोरे व त्यांच्यात जोरदार वाद झाला, त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. आमदार सातत्याने दमदाटी करतात, अर्वाच्य भाषा वापरतात, रुग्णालयाच्या कामात ढवळाढवळ करतात, अशी मोरे यांची तक्रार होती. तर, रुग्णालयात रुग्णांच्या हिताच्या गोष्टी होत नाहीत. तर, एकाहून एक गैरकारभार रुग्णालयात सुरू असल्याचे जगताप यांचे म्हणणे होते. रुग्णालयातील १४ आक्षेपार्ह मुद्दे असलेले निवेदन जगताप यांनी अजितदादांना दिले. त्यानंतर रुग्णालयाच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश अजितदादांनी जिल्हाधिकारी विकास देशमुख यांना दिले होते. त्यानुसार, डॉ. श्रीकर परदेशी यांनी चौकशीचे काम सुरू केले होते. तथापि, सोमवारी डॉ. मोरे यांची बदली झाल्याचे वृत्त आले. त्याची आयुक्त परदेशी यांनाही कल्पना नव्हती. डॉ. मोरे यांच्या जागी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे ए. बी. नांदापूरकर यांची वर्णी लागल्याचे सांगण्यात येते.
आमदार जगताप यांनी रुग्णालयाबाबत अनेक तक्रारी अजितदादांकडे केल्या होत्या. त्यांनी मांडलेल्या मुद्दय़ांची दखल अजितदादांनी घेतली. त्यांच्या व आमदारांच्या दबावामुळेच ही बदली झाल्याचे मानले जाते.