पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिल्या साक्षीदाराची साक्ष शुक्रवारी विशेष न्यायालयात नोंदविण्यात आली. आठ वर्षांपूर्वी डॉ. दाभोलकर यांची हत्या झाली होती. त्यानंतर या खटल्याच्या प्रत्यक्ष कामकाजास सुरूवात झाली.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण खटल्याचे कामकाज विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू आहे. डॉ. दाभोलकर आठवडय़ातून दोन ते तीन दिवस सदाशिव पेठेतील एका सदनिकेत वास्तव्यास असायचे.डॉ. दाभोलकर यांच्या घरातून काही कागदपत्रे तपासासाठी ताब्यात घेण्यात आली होती. त्या वेळी डॉ. दाभोलकर वास्तव्यास असलेल्या इमारतीतील शेजारी अविनाश दावलभक्त यांना पोलिसांना पंच केले होते.  शुक्रवारी दावलभक्त यांची साक्ष नोंदविण्यात आली, अशी माहिती केंद्रीय गुन्हे विभागाचे (सीबीआय) विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश सूर्यवंशी यांनी दिली.

पोलिसांनी माझ्यासमोर सदनिकेत पंचनामा केला. पुस्तके, डायरी, कपडे असे साहित्य  ताब्यात घेतले होते, असे दावलभक्त यांनी न्यायालयात सांगितले.  हे साहित्य दावलभक्त यांनी न्यायालयात ओळखले.