मुंबई-बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर बुधवारी एकापाठोपाठ तीन अपघात झाले. त्यापैकी एका अपघातात बुधवारी सकाळी ट्रकचालकाचा होरपळून मृत्यू झाल्ली. अपघातात दोन ट्रकच्या मधोमध असलेलय़ा ट्रकची केबीन पेटल्याने चालक होरपळून जागीच मृत्युमुखी पडला. मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव औरंगजेब खान असे आहे. मृत्युमुखी पडलेला ट्रकचालक दुग्धजन्य पदार्थ घेऊन निघाला होता.
दुसऱ्या अपघातात मुंबई- बंगळुरु बाह्य़वळण मार्गावर बुधवारी पहाटे नवले पुलाजवळ कोंबडय़ाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने एका अज्ञात वाहनाला धडक दिली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रभाकर उमराटकर, संजय रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा जवानांनी मदत कार्यास सुरुवात केली. ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेला चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास झालेल्या तिसऱ्या अपघातात रस्त्यात थांबलेल्या अपघातग्रस्त ट्रकवर पाठीमागून येणारा एक ट्रक धडकण्याच्या बेतात होता. मात्र, ट्रकचालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला डोंगर कपारीवर ट्रक नेला. या ट्रकमधून बाह्य़वळण मार्गावर मोठय़ा प्रमाणावर तेल सांडले होते. दरम्यान, अग्निशमन दलाचे पथक तेथून रवाना झाले होते. पोलिसांनी पुन्हा ही माहिती अग्निशमन दलाला कळविली. जांभूळवाडी दरीपुलावरुन चांदणी चौकाच्या दिशेने तीन ट्रक निघाले होते. तीव्र उतारावर एका पाठोपाठ तीन ट्रक एकमेकांवर मागून आदळले. दुग्धजन्य पदार्थाची वाहतूक करणारा ट्रक मधोमध होता. त्या ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने केबिन पेटली. ट्रकचालकाला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामध्ये ट्रकचालक होरपळला.