पुणे पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या उपस्थित आज पालिकेत शहरातील पीएमपीएमएलची खास बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, तुकाराम मुंढे या सभेतून कोणालाही कल्पना देता निघून गेल्यामुळे नगरसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.
मुंढे कोणाला विचारून सभागृहातून बाहेर गेले असा प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सभा तहकूब करावी, अशी मागणी केली. तसेच कोणतीही कल्पना न देता सभात्याग केल्यामुळे मुंढे यांच्यावर कंपनी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली आहे.

तुकाराम मुंढे सभागृहातून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक महेंद्र पठारे आणि भैय्यासाहेब जाधव यांनी सभागृहात ठिय्या मांडत या कृतीचा निषेध व्यक्त केला. यापूर्वी तुकाराम मुंढे यांनी सभागृहात पीएपीएमलचा आढावा सादर केला. लोकप्रतिनिधींच्या भाषणाला सुरुवात झाल्यानंतर मुंढे सभागृहातून निघून गेले. आम्हाला प्रभागातील बस सेवेसंदर्भातील समस्या मांडायच्या होत्या. प्रभागातील प्रलंबित प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे होते. त्यामुळे त्यांनी सभागृहात थांबणे अनिवार्य होते, असा सूर नगरसेवकांमधून उमटत आहे.