पुणे : स्वाइन फ्लू या विषाणू संसर्गानंतर करोना या जगभरामध्ये थैमान घातलेल्या विषाणू संसर्गाने भारतात प्रवेश केला आणि मागील दहा दिवसांमध्ये सर्वत्र आणीबाणीसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. विषाणू संसर्गाला रोखण्यासाठी नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे सगळ्याच स्तरातील सरकारी यंत्रणा मात्र दिवसाचे चोवीस तास, या संसर्गाला रोखण्यासाठी परिस्थितीशी दोन हात करत आहेत.
राज्यातील महापालिका, जिल्हा प्रशासन आणि राज्य शासन यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. परीक्षा पुढे ढकलणे असो की धार्मिक, सामाजिक उत्सव उपक्रम रद्द करणे असो, निर्णय आणि त्यांची अंमलबजावणी वेगवान पद्धतीने करण्यात येत आहे. जनतेला या आजाराचे गांभीर्य समजण्यासाठी मोठय़ा प्रमाणात कार्यक्रम घेतले जात आहेत. या कार्यक्षमतेबद्दल सर्वच स्तरांतून यंत्रणेचे कौतुक होत आहे.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, प्रसिद्धीच्या वलयापासून लांब असलेल्या अंगरक्षक, चालक, सेवक, स्वीय सहायक अशा अनेक व्यक्ती या संपूर्ण लढय़ाचा महत्त्वाचा भाग आहेत. पुणेकरांनी आतापर्यंत केलेले सहकार्य चांगलेच आहे, मात्र भविष्यात आणखी कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि मुख्य म्हणजे स्वतचे आरोग्य जपून सर्वानी हे काम करायचे आहे असे मी यंत्रणेला सांगत आहे.
पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, पुणे महापालिकेचेच नव्हे तर राज्यातील सर्व विभाग ज्या पद्धतीने काम करत आहेत ते पाहता कृतज्ञता एवढी एकमेव भावना आहे. आरोग्य विभाग अविरत चोवीस तास काम करत आहे. परदेशातून येणाऱ्या संशयित रुग्णांच्या विलगीकरणासाठी जागा उपलब्ध करून देणे, त्यांच्यासाठी सोयीसुविधा उपलब्ध करणे, त्यांच्या खानपानाची व्यवस्था लावणे, स्वच्छता, औषधोपचार अशा अनेक सेवांसाठी असंख्य माणसे कार्यरत आहेत. या सगळ्याच्या बरोबरीने आवश्यक बैठकांना हजेरी लावणे, नियोजन करणे देखील सुरू आहे. मी स्वत महापालिका आयुक्त म्हणून दिवसभर बैठका घेत आहे. दिवसाला किमान शंभर फोन घेतो. नागरिक वैयक्तिक तक्रारींपासून सूचनांपर्यंत अनेक गोष्टी कळवत आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, शेकडो फोन आणि असंख्य मेसेज रोजच्या रोज माझ्यापर्यंत येत आहेत. त्या सर्वानी दिलेली माहिती खरी आहे का हे तपासणे आणि निर्णय घेणे हे आव्हानात्मक आहे.
विशेष म्हणजे नागरिकांनी कमीत कमी एकत्र येण्याचे पाहणे हे मुख्य आव्हान आहे, प्रत्यक्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नागरिकांनी अधिकाधिक घरात राहणे, बाहेर न पडणे आवश्यक आहे. संपूर्ण देशाचे लक्ष पुणे आणि पिंपरी- चिंचवडकडे लागले असताना स्वयंप्रेरणेतून नागरिकांनी संसर्ग पसरणार नाही याची खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. बैठका, नियोजन, जाहिराती, भित्तिपत्रके या सर्व माध्यमांतून नागरिकांना सतर्क करत आहोत.
- विमानतळांवर आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय पथके तैनात
- आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यरत
- पोलिस यंत्रणेचे योगदान
- महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून विविध प्रकारची कामे