नॅकची ‘ब’ श्रेणी मिळालेल्या महाविद्यालयांनाही आता परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याने अभ्यासक्रम चालवता येणार असून विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) त्यांच्या नियमामध्ये बदल केले आहेत.
परदेशी महाविद्यालयांना भारतात त्यांची कॅम्पस उभारण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र, त्याला परदेशातील विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांच्या निकषांमध्ये बदल केले आहेत. आता नॅककडून ‘ब’ श्रेणी मिळालेल्या महाविद्यालयांनाही परदेशी विद्यापीठांच्या सहकार्याने अभ्यासक्रम सुरू करता येणार आहेत. त्यानुसार आयोगाने त्यांच्या नियमावलीमध्ये बदल केले आहेत.
नव्या नियमावलीनुसार शासकीय महाविद्यालयांना नॅकच्या श्रेणीची आवश्यकता नाही. त्याचप्रमाणे तंत्रशिक्षण संस्थांना यामधून वगळण्यात आले आहे. परदेशी विद्यापीठांना आयोगाच्या नियमावलीबरोबरच शासनाने केलेल्या निकषांचीही पूर्तता करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दोन्ही शिक्षणसंस्थामध्ये कशा प्रकारचा करार आहे, अभ्यासक्रमाची रूपरेषा काय आहे, त्याचे शुल्क किती आहे, अभ्यासक्रम आणि शिक्षणसंस्था मान्यतेचे निकष पूर्ण करते का अशा सर्व गोष्टी अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी संकेतस्थळावर जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या शिक्षणसंस्थाचे परदेशी विद्यापीठांबरोबर करार झाले आहेत किंवा त्याबाबत प्रक्रिया सुरू आहे, त्यांनी सहा महिन्यांमध्ये सर्व निकषांची पूर्तता करून आयोगाची मान्यता घेणे आवश्यक आहे.