पुण्यातील नियोजित विमानतळ कोणत्याही परिस्थितीत बारामतीत नेण्यात येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निक्षून सांगितले. नियोजित विमानतळासाठी योग्य जागा लवकर निश्चित करा. आता उशीर करू नका, अशी विनंती संबंधित यंत्रणेला केली असल्याचे ते म्हणाले. चाकणलगत म्हाळुंगे येथे एका उपाहारगृहाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलताना पवारांनी हे विधान केले.

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आधी, खेडचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांनी विमानतळाचा विषय उपस्थित केला. “विमानतळावरून आमच्याकडे नको त्या गोष्टी घडल्या. खेडच्या विमानतळाला विरोध व्हायला नको होता. विमानतळ झाले असते तर खेडचा सर्वांगीण विकास झाला असता. आता मात्र अजित पवार यांनी ते विमानतळ बारामतीत करायचे ठरवले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीत होत असल्याचा आम्हाला आनंदच आहे. निदान डोमेस्टिक विमानतळ खेड परिसरात व्हावे, अशी आमची आग्रही मागणी आहे. उपमुख्यमंत्र्यांनी तसा शब्द दिला असून तो पाळला जाईल, याची खात्री आहे.” असं ते म्हणाले.

तर मोहितेंच्या या विधानांचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले की, “दिलीप मोहिते यांच्यासह अनेकांचा गैरसमज झालेला आहे. कोणत्याही परिस्थितीत विमानतळ बारामतीत नेण्यात येणार नाही. कारण नसताना कोणीही बारामती-बारामती करू नका. पुण्याचे सध्याचे विमानतळ संरक्षण विभागाचे आहे. त्यामुळे वापरावर मर्यादा येतात. एखाद्या शहराची वेगाने वाढ होत असते, रहदारी वाढते. तेव्हा २४ तास चालू राहणारे विमानतळ हवे असते. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होत आहेत. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, अशावेळी पुण्यात विमानतळ नितांत गरजेचे आहे. ते नेमके कुठे व्हावे, यादृष्टीने यंत्रणांची पाहणी सुरू आहे. विमानतळासाठी योग्य वाटणारी जागा लवकर निश्चित करा. मात्र, आता विमानतळाला उशीर करू नका.”

तसेच, “विमानतळ करत असताना उद्याची ५०-१०० वर्षे डोळ्यासमोर ठेवून नियोजन करावे लागेल.” असंही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बोलून दाखवलं.