scorecardresearch

विद्यापीठाकडून दुसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या दुसऱ्या सत्राचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार दुसरे सत्र मार्च ते मे दरम्यान सुरू होणारे दुसरे सत्र जून ते सप्टेंबरदरम्यान संपणार आहे. विद्यापीठाने प्रत्येक अभ्यासक्रमनिहाय शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर दिले आहे. या वेळापत्रकानुसार शैक्षणिक कामकाज करावे लागणार आहे. वाणिज्य व व्यवस्थापन या विद्याशाखेअंतर्गत एमबीए, एमसीए (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र २ मे पासून सुरू होईल. एमसीएचे दुसरे सत्र १८ एप्रिलला सुरू झाले आहे. तसेच मानवविज्ञान विद्याशाखेंतर्गत कला, सामाजिक शास्त्र या अभ्यासक्रमाचे पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे पहिले सत्र १५ मार्चला संपून २१ मार्चपासून दुसरे सत्र सुरू झाले आहे. तर २७ जूनपर्यंत दुसरे सत्र संपवण्यासाठी मुदत आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर पदवी, वास्तुकला अभ्यासक्रमांचे पहिले सत्र मार्चमध्ये, तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे पहिले सत्र ६ एप्रिल रोजी संपले. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षांचे दुसऱ्या सत्रासाठी ११ एप्रिल ते १५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. विज्ञान, औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे दुसरे सत्र पूर्ण करण्यासाठी १५ जून आणि वास्तुकलासाठी २३ जुलैची मुदत देण्यात आली आहे. आंतरविद्या शाखीय विद्या शाखेअंतर्गत एमपीएड, एम.एड (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र २ मे ते ३० सप्टेंबर, तर बीपीएड (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाचे दुसरे सत्र ८ जूनला सुरू होऊन २६ सप्टेंबरदरम्यान संपेल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: University announces revised schedule second session savitribai fule university ysh

ताज्या बातम्या