मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल होण्यास परिस्थिती अनुकूल

राज्यभर उन्हाची काहिली आणि अधूनमधून गारपिटीसह शेतीचे नुकसान करून जाणारा अवकाळी पाऊस अशा परिस्थितीत सध्या अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरात मान्सूनची चाहूल लागली आहे. नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अंदमानच्या समुद्रात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

हवामानाच्या ‘डायनॅमिक’ प्रकारच्या प्रारूपांनी नोंदवलेली निरीक्षणे आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या प्रक्रिया यांवरून ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने हा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटे या भागात १५ मे च्या आसपास मान्सून दाखल होण्यास स्थिती अनुकूल असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

पाऊसभान

दरवर्षी मान्सून साधारणत: १ जूनला केरळात येतो, त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो आणि सप्टेंबरमध्ये राजस्थानमधून त्याचा परतीचा प्रवास सुरू होतो. गेल्या वर्षी मान्सून अंदमानात वेळेवर पोहोचला होता, परंतु त्याचे केरळमधील आगमन लांबले होते. ‘आयएमडी’ने २०१७ साठी वर्तवलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार देशात सरासरीच्या जवळ पाऊस पडेल, अशी शक्यता नोंदवण्यात आली होती. गेल्या पन्नास वर्षांतील आकडेवारी लक्षात घेता यंदाचे पर्जन्यमान किमान ९६ ते कमाल १०४ टक्क्य़ांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.