‘चिंटू २- खजिन्याची चित्तरकथा’ या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीत शुक्रवारी पुण्यात करण्यात आले. चित्रपटाचे निर्माते श्रीरंग गोडबोले, ‘चिंटू’ या हास्यचित्रमालिकेचे जनक चारूहास पंडित व प्रभाकर वाडेकर, गीतकार संदीप खरे, संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी, अभिनेत्री विभावरी देशपांडे, बालगायक शुभंकर कुलकर्णी, ‘चिंटू २’चा नायक शुभंकर अत्रे आणि इतर बालकलाकार उपस्थित होते.
चित्रपटातील गाणी श्रीरंग गोडबोले व गाणी संदीप खरे यांनी रचली आहेत. लहान मुलांचा सुटीचा आनंद टिपणारे ‘स..स..सुट्टी’ हे गाणे, ‘या विश्वाची आम्ही लेकरे’ ही प्रार्थना, ‘खालीपिली उगाचच रोने का नही’ हे प्रेरणादायी गीत या गाण्यांचा चित्रपटात समावेश आहे. सलील कुलकर्णी यांचा मुलगा शुभंकर कुलकर्णी याने ‘चिंटू’ला आवाज दिला आहे. तर शरयू दाते, मयुरी अत्रे, अश्विन रानडे, सई देशपांडे, यशिता केळकर, नंदेश उमप आदी गायकांनीही चित्रपटात गाणी गायली आहेत. डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘मात्र आपल्याकडे बालचित्रपटांच्या संगीताकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाते. या कलाकृतींबरोबर भेदभाव नको. त्यांना विशेष स्थान मिळणे आवश्यक आहे.’’