पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात नगर जिल्ह्यातील वैभव दिघे राज्यात आणि मागासवर्गीयात प्रथम आले आहेत, तर पुणे जिल्ह्यातील पूजा पानसरे यांनी महिला प्रवर्गातून पहिला क्रमांक मिळवला आहे.
सहायक वन संरक्षक गट अ आणि वनक्षेत्रपाल गट ब या संवर्गातील एकूण शंभर पदांवरील भरतीसाठी १५ सप्टेंबर २०१९ रोजी मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केला. वनक्षेत्रपाल गट ब संवर्गाच्या अनुसूचित जमाती महिला वर्गवारीतील एका पदाचा निकाल उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राखून ठेवण्यात आला आहे. या पदांची गुणवत्ता यादी, शिफारस यादी आणि गुणांची वर्गवारीनिहाय सीमारेषा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची पदासाठीची पात्रता, प्रमाणपत्रांची सत्यासत्यता, वैधता निगडित प्राधिकरणांकडून तपासण्याच्या अटीवर संबंधित पदांवर शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. हा निकाल विविध न्यायालयात, न्यायाधिकरणात दाखल न्यायिक प्रकरणांवरील अंतिम न्यायनिर्णयांच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अंतिम निकालातील ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास संबंधित उमेदवारांनी गुणपत्रके खात्यावर पाठवल्याच्या दिनांकापासून दहा दिवसात आयोगाकडे अर्ज करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.