पिंपरी : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी पती शशांक हगवणे आणि सासू लता यांच्याविरोधात एका जेसीबी व्यवहारात ११ लाख ७० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रशांत लक्ष्मण येळवंडे (रा. निघोजे, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२२ मध्ये प्रशांत यांनी लता व शशांक हगवणे यांच्याकडून २४ लाख रुपयांना जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. त्यावेळी त्यांनी सुरुवातीला पाच लाख रुपये देऊन जेसीबी ताब्यात घेतला होता. जेसीबीवर १९ लाखांचे बँकेचे कर्ज होते. हप्ते भरण्यासाठी प्रशांत यांनी दरमहा ५० हजार देण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे प्रशांत यांनी ठरल्याप्रमाणे लता यांच्या खात्यात एकूण सहा लाख ७० हजार रुपये जमा केले. मात्र, हगवणे यांनी बँकेचे हप्ते भरले नाहीत. रक्कम स्वत:साठी वापरली. परिणामी, ऑगस्ट २०२४ मध्ये बँकेने जेसीबी ताब्यात घेतला. त्यानंतर हगवणे यांनी जेसीबी पुन्हा बँकेतून सोडवला. मात्र, प्रशांत यांना परत दिला नाही. ११ लाख ७० हजार रुपये परत मिळावे अथवा जेसीबी ताब्यात द्यावा, यासाठी प्रशांत यांनी हगवणे यांच्याकडे पाठपुरावा केला. पण, पैसे आणि जेसीबी दिला नाही.
चर्चा करण्यासाठी प्रशांत गेले असता शशांक याने कमरेवरील पिस्तूलवर हात ठेवत ‘तू मशीन १४ महिने वापरली आहे, आता पैसे मागू नको, नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत.’ अशी धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.