तानाजी काळे

इंदापूर : अखंड हरिनामाच्या जयघोषात, टाळमृदंगांच्या गजरात व विठ्ठलनामाच्या जपात, अंथुर्णेकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन शुक्रवारी सकाळी निघालेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत सायंकाळी मुक्कामी दाखल झाला.  सवंदडीच्या माळावर गावातील भजनी मंडळी व ग्रामस्थांनी पालखीचे मोठय़ा उत्साहात स्वागत करत पावसासाठी आळवणी करत पांडुरंगाला साकडे घातले.

सरपंच प्रवीण डोंगरे, इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव,  बाबासाहेब भोंग, पांडुरंग हेगडे, अ?ॅड.सचिन राऊत, गोरख आदिलग, अमोल हेगडे, विठ्ठल नाळे व उपस्थित मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. गावकरी मंडळीसह  गावातील सुवर्णयुग पतसंस्था, अष्टविनायक पतसंस्था व अष्टविनायक ग्रुप, केतकेश्वर पतसंस्था, कचरेवाडी व कौठळी ग्रामस्थ यांच्या वतीने मोठय़ा प्रमाणात अन्नदान करण्यात आले. सुवर्णयुगेश्वर पतसंस्थेच्या वतीने सुगंधी दूध वाटप केले. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया, ग्रामीण रुग्णालय, गणेश पतसंस्थेच्या वतीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. पान उत्पादक शेतकऱ्यांनी विडय़ांच्या पानांचे वाटप केले.  पालखी मैदानावर पालखी आल्यानंतर पंचक्रोशीतील दहा बारा गावातील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती, मात्र शांततेत सर्व जण दर्शनाचा लाभ घेत होते. दरम्यान वाटेत शेळगाव फाटा येथे सरपंच रामदास शिंगाडे, उपसरपंच मिच्छद्र भोंग, लालासाहेब पवार, साहेबराव शिंगाङे, विठठल जाधव, हनुमंत मान, मोहन दुधाळ यांनी पालखीचे मनोभावे स्वागत केले. गोतोंडीत सरपंच गुरुनाथ नलवडे, उपसरपंच परशुराम जाधव, ग्रामसेवक बी.के.रणवरे, दिनकर नलवडे यांनी पालखीचे स्वागत केले. ग्रामस्थांनी घरुन आणलेल्या पिठलं- भाकरीचा वारकऱ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

पोलीस अधीक्षकही झाले वारकरी

संतांच्या पालख्या हजारो वैष्णवांच्या मांदियाळीसह पंढरपूपर्यंत जात असताना त्यांची मोठी वाटचाल पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून होत असते. हा संतभार विठुरायाच्या पंढरीत पोहोचवण्यासाठी पालखी मार्गावरील सर्वाचाच ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, विशेषत: पोलीस प्रशासनाचा मोठा कसोटीचा काळ असतो. आपापल्या पद्धतीने सर्वच अधिकारी जबाबदारी घेऊन कर्तव्य बजावत असतात. एका जिल्ह्यातून पालखी पुढील जिल्ह्यात प्रवेश करताना पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांकडून दोन्ही जिल्ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा परंपरेनुसार सन्मान केला जातो. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांचाही सत्कार झाला आणि या सोहळय़ात तेही वारकरी झाले.