वाहनांची नंबर प्लेट किंवा डुप्लिकेट चावी बनविताना वाहनाच्या मालकीची कागदपत्रे पेंटर, चावी तयार करणाऱ्यास दाखवविणे बंधनकार करण्यात आले आहे. वाहनाच्या मालकीची कागदपत्रे न पहाता डुप्लिकेट चावी आणि नंबर प्लेट करून देतील अशा दुकानदारावर पोलीस अदखलपात्र गुन्हा दाखल करणार आहेत.
शहरात वाहनचोरीच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ झाली आहे. वाहनचोरी करणाऱ्या टोळ्या कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या टोळ्या चोरीच्या वाहनांची डुप्लिकेट चावी तयार करतात. त्याचबरोबर वाहनांची नंबर प्लेटही बदलतात. नंबर बदलल्यामुळे चोरीच्या वाहनाचा खरा नंबर कोणाच्या लक्षात येत नाही. त्यामुळे यापुढे वाहनांची चावी बनवून देणाऱ्यांनी आणि नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकानदारांनी वाहनाच्या मालकी संदर्भातील कागदपत्रे तपासणूनच संबंधितांना चावी अथवा नंबरप्लेट तयार करून द्यावी, असे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील पेंटर व चावी तयार करून देणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना हा लेखी आदेश देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. नंबर प्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांनी कोणत्या वाहनाची चावी तयार करून दिली, तसेच कोणत्या वाहन चालकास नंबर प्लेट तयार करून दिली याबाबत नोंदी ठेवण्यास सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार आणि पेंटरवर भारतीय दंड संहिता कलम १८७ प्रमाणे कारवाई करण्यात येणार असून त्यांच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद करण्यात येणार आहे, असे पोलिसांकडून काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.