|| अविनाश कवठेकर

भावी आमदारांची ‘चाल’ भाजपसाठी डोकेदुखी :– पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस तसेच शिवसेनेमधील नाराज पदाधिकाऱ्यांना आणि माजी लोकप्रतिनिधींना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश देण्यासाठीची निवडणूक लढवत असलेल्या भाजप उमेदवारांची ‘राजकीय तडजोड’ पक्षासाठी भविष्यात डोकेदुखी ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक मतदार संघातील प्रतिस्पर्धी पक्षातील पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये घेतले जात असून निवडणूक जिंकता यावी यासाठी विविध आश्वासने देऊन पक्ष प्रवेश घडवून आणले जात आहेत. मात्र त्यांना देण्यात येत असलेली आश्वासने महापालिका निवडणुकीच्या वेळी पाळणे ही पक्षासाठी तारेवरची कसरत ठरणार आहे. या पक्षप्रवेशांमुळे भाजपमध्येही खदखद आहे.

निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वडगांवशेरी, शिवाजीनगर, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंटमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेतील नाराज पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा संख्येने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला खिंडार पाडण्याबरोबरच शिवसेनेतील एक नाराज गटही भाजपच्या गळाला लागला आहे. वडगांवशेरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बापू पठारे, माजी नगरसेवक किशोर विटकर, सुनील गोगले, नारायण गलांडे, शिवसेनेचे शिवाजीनगर मतदार संघातील माजी नगरसेवक सनी निम्हण, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अमित मुरकुटे, माजी नगरसेवक विनोद ओरसे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी, सुधीर जानज्योत, माजी उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी नगरसेवक आनंद छाजेड यांचा नुकताच भाजप प्रवेश झाला आहे.

राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्याची रणनीती भाजपने आखली असून महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक वरिष्ठ पदाधिकारी काही समर्थक नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जाते. भाजपने  निवडणुकीसाठी तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. त्या मतदारसंघांमध्ये तसेच पुन्हा उमेदवारी मिळालेल्या विद्यमान आमदारांच्या मतदारसंघांमध्येही प्रतिस्पर्धी उमेदवारांचे आव्हान आहे.  विजय मिळविण्यासाठी आमदारांकडून फोडाफोडी केली जात आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील उमेदवारी न मिळालेल्या नाराज गटांना हाताला धरण्यात आले आहे.  नगरसेवक पदासाठी संधी देणे अडचणीचे असल्यास कुटुंबातील सदस्याला संधी दिली जाईल. म्हाडा, अण्णा भाऊ साठे महामंडळात संधी दिली जाईल, अशी आश्वासने पक्षप्रवेशासाठी दाखविण्यात आली आहेत. यामुळे मतदार संघातील भाजपचे संघटन आणखी मजबूत होणार आहे. वडगांवशेरी, पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला येथील उमेदवारांना  त्याचा फायदा होणार असला, तरी ही राजकीय तडजोड पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

पुन्हा अन्यायाचीच शक्यता

सन २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपची लाट लक्षात घेऊन आणि स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी अन्य पक्षातील नगरसेवकांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी देण्यात आली.  अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना आणि चांगले काम केलेल्या नगरसेवकांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यावरून पक्षामधील निष्ठावंत कार्यकर्ते, पदाधिकारी, नगरसेवक यांच्यातील नाराजी उफाळून आली होती. काही उमेदवारांची नावे तर उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर बदलण्यात आल्याचे प्रकार घडले होते. आता नव्याने आश्वासने दाखवून पक्षप्रवेश करून घेतले जात आहेत. जे पक्षात येत आहेत, त्यांना दिलेल्या आश्वासनांप्रमाणे कार्यवाही करावी लागली, तर निष्ठावंतांवर पुन्हा अन्याय होणार असल्याची भावना कार्यकर्ते-पदाधिकारी बोलून दाखवत आहेत.