नाटय़मय घडामोडीनंतर पिंपरी विधानसभेत माजी आमदार अण्णा बनसोडे यांची संभाव्य उमेदवारी कापून राष्ट्रवादी काँग्रेसने नवख्या नगरसेविका सुलक्षणा धर यांची वर्णी लावली आहे. डावलण्यात आल्याने बनसोडे यांनी बंडखोरी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शिवसेनेच्या विरोधात जाऊन भाजप तसेच रिपाइंतील इच्छुकांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केले आहेत.

पिंपरी विधानसभेसाठी गेल्या पाच वर्षांपासून तयारीत होते. नगरसेवक राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ आदींची नावे उमेदवारीसाठी चर्चेत होती. त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीने पहिल्यांदा निवडून आलेल्या नगरसेविका धर यांची उमेदवारी अनपेक्षितपणे  जाहीर केली आहे. संततुकारामनगर-कासारवाडी प्रभागातून त्या महापालिकेत निवडून आल्या आहेत. गुरुवारी दुपारी त्यांचे नाव जाहीर होताच राष्ट्रवादी वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. पिंपरीतील उमेदवारी स्पष्ट झाल्यानंतर लगेचच अण्णा बनसोडे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन अपक्ष निवडणूक लढवणार आणि शुक्रवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, शेखर ओव्हाळ यांनीही रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, शिवसेनेला मतदार संघ सोडण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या अमित गोरखे यांनीही बंडखोरी केली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या वेळी तिसऱ्या स्थानावर असलेल्या रिपाइं नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला.

‘माझं काय चुकलं’

गेल्या वेळी २२०० मतांनी पराभूत झाल्यापासून पिंपरी विधानसभेसाठी तयारी करतो आहे. लोकसभेला पार्थ पवारांसाठी मनापासून काम केले. तरीही आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली. अजित पवारांनी सांगावे तरी, माझं काय चुकले, अशी प्रतिक्रिया अण्णा बनसोडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पिंपरीतील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव ऐकून मी चकित झालो, असे सांगत कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढणार आणि निवडून येणार, असा दावाही त्यांनी केला.