scorecardresearch

Premium

‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..’

कौतुक करता करता ‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..’ असे उद्गार विजया मेहतांच्याही तोंडून अगदी नकळत येऊन गेले आणि ज्यांचे असे भरभरून कौतुक सुरू होते, त्या गिरीश कर्नाड यांनीही विजयाबाईंच्या या वाक्याला स्मितहास्य करत नकळत दाद दिली.

‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..’

आजचा दिवसच मुळी त्यांचा होता. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेकविध पैलू उलगडून दाखवले जात होते. त्यांच्या साहित्याचे, त्यांच्या दिग्दर्शनाचे, त्यांच्यातील नाटककाराचे, त्यांच्या सामाजिक जाणिवांचे कौतुक करताना सगळ्यांनाच किती बोलू.. असे होत होते. कौतुक करता करता ‘ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..’ असे उद्गार विजया मेहतांच्याही तोंडून अगदी नकळत येऊन गेले आणि ज्यांचे असे भरभरून कौतुक सुरू होते, त्या गिरीश कर्नाड यांनीही विजयाबाईंच्या या वाक्याला स्मितहास्य करत नकळत दाद दिली.
‘खेळता खेळता आयुष्य’ या कर्नाड यांच्या आत्मचरित्र प्रकाशनाचा समारंभ शनिवारी इतका रंगला, की उपस्थितांना कधी हे पुस्तक हाती पडते असे झाले. कार्यक्रम संपताच पुस्तक खरेदी करून त्यावर कर्नाड यांची स्वाक्षरी घेण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर, अनुवादिका उमा कुलकर्णी आणि विजया मेहता या तिघांनी आत्मचरित्राच्या निमित्ताने पुस्तकाचे आणि कर्नाड यांच्याही व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले.
हे पुस्तक वाचताना मी वाचकाऐवजी प्रेक्षक बनले. त्या आधी मी त्याने लिहिलेला ‘उणे पुरे शहर एक’ हा प्रयोग पाहिला होता. रंग आणि रचना उधळणाऱ्या एखाद्या शोभादर्शकाची रचना असावी तसा गिरीश कला उधळतो. त्यामुळे एका शहराच्या भावविश्वाचा तो प्रयोग म्हणजे मला शोभादर्शक वाटला. सामान्य वाटणारे; पण प्रयोगात असामान्य होणारे असे हे (कर्नाड) व्यक्तिमत्त्व आहे. तो दिग्दर्शन करतो; पण त्याच्या प्रत्येक रचनेत परफॉर्मरचे स्पंदन असते.. अशा शब्दात विजयाबाई व्यक्त होत होत्या.
गिरीशच्या व्यक्तिमत्त्वामध्ये मला सर्वात महत्त्वाचे वाटले ते त्याचे भारतीयत्वाचे भान. प्रदेश, देश, भाषा, काळ यांच्या सीमेपलीकडे जाऊन कलासंस्कार उभे करण्याची ताकद त्याच्यात आहे आणि ही ताकद निर्माण करायची, तर राजकीय, सामाजिक, नैतिक अधिष्ठान पक्के हवे.. असे सांगताना विजयाबाई क्षणभर थांबल्या आणि पटकन बोलून गेल्या, ए गिरीश! मी तुझी किती स्तुती करतेयं..
एका बुद्धिमान, तरल आणि संवेदनशील माणसाचे हे आत्मचरित्र आहे. संपूर्ण पुस्तकात कर्नाड यांचे चिंतनशील, सुजाण, सखोल आणि प्रगल्भ आयुष्य दिसते. माणसांमधील गुंतागुंतीच्या नात्यांचे त्यांना विलक्षण कुतूहल आहे आणि अगदी कमी शब्दांमध्ये व्यक्तिचित्रणे करणारे ते एक अल्पाक्षरी लेखक आहेत, अशी भावना माजगावकर यांनी व्यक्त केली. कर्नाड यांनी प्रामुख्याने त्यांच्या चाळिशीपर्यंतचा प्रवास या चरित्रात रेखाटला आहे. त्यांनी आता वाचकांसाठी उत्तरार्ध लिहावा, अशीही विनंती माजगावकर यांनी या वेळी केली.
आईने ब्याऐंशी वर्षांची असताना लिहिलेले तीस-चाळीस पानांचे आत्मचरित्र ही माझ्या आत्मचरित्र लेखनाची प्रेरणा आहे आणि त्याबरोबरच स्वातंत्र्यानंतरचा देशउभारणीचा तसेच या देशाचे कलाक्षेत्र घडणीचा जो काळ मी अनुभवला, तो समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे, असे मनोगत कर्नाड यांनी व्यक्त केले.

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-05-2013 at 03:00 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×