पुणे महापालिका आयुक्त महेश पाठक यांची बदली झाली असून जिल्हाधिकारी विकास देशमुख यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावर तीन महिन्यांपूर्वी आलेले अभिषेक कृष्णा यांचीही बदली झाली असून त्यांची नियुक्ती नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून झाली आहे.
तत्कालीन महापालिका आयुक्त महेश झगडे यांच्या जागी पाठक यांची नियुक्ती १८ मे २०११ रोजी करण्यात आली होती. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव म्हणून ते त्या वेळी मंत्रालयात होते. शहरासाठी पाणीपुरवठा प्रकल्प, मेट्रो, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, बीआरटी, कचरा प्रक्रिया आदी पायाभूत सेवा-सुविधा विकसित करण्यावर पाठक यांनी विशेष भर दिला. त्यामुळे पर्वती, वडगाव, वारजे, भामा आसखेड हे पाणीपुरवठा प्रकल्प मार्गी लागले. स्थानिक संस्था कराची (लोकल बॉडी टॅक्स-एलबीटी) अंमलबजावणी पाठक यांच्या कार्यकाळातच पुण्यात सुरू झाली. जकातीपेक्षा या कराचे उत्पन्न महापालिकेला वाढीव स्वरूपात मिळत आहे आणि या उत्पन्नामध्ये राज्यात पुणे महापालिका पहिल्या क्रमांकावर आहे. पाठक यांच्या कार्यकाळात केंद्र व राज्य सरकारसह अनेकविध नामांकित संस्थांचे पुरस्कारही महापालिकेला मिळाले.
विकास देशमुख महापालिकेत
आयुक्त म्हणून पुण्यात आलेले विकास देशमुख गेली अडीच वर्षे पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यापूर्वी ते सातारचे जिल्हाधिकारी होते. पुण्यात अडीच वर्षांचा कार्यकाळ झाल्यावर त्यांची पदोन्नती झाली. ते आता महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त झाले आहेत. महापालिकेत तीन महिन्यांपूर्वी आलेले अतिरिक्त आयुक्त अभिषेक कृष्णा नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्त झाले आहेत.
पुण्यातील कार्यकाळाबद्दल मी समाधानी आहे. या काळात शहरासाठी नेहरू योजनेतून बाराशे कोटींचा निधी मिळवण्यात यश आले. तसेच मेट्रो, रस्ते विकास व अन्य अनेक प्रकल्प मार्गी लागले.
– महेश पाठक