‘मी आणि हसरी गॅलरी’ पुस्तकाचे प्रकाशन
‘शि. द. फडणीस हे कायम नावीन्याचा शोध घेणारे व्यक्तिमत्त्व आहे. दु:खभरल्या जगात गेल्या दोन-तीन पिढय़ांना त्यांनी एकही शब्द न लिहिता हसवले,’ अशी भावना ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केली.
‘सुरेश एजन्सी’ आणि ‘अक्षरधारा’ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात शकुंतला फडणीस यांनी लिहिलेल्या ‘मी आणि हसरी गॅलरी’ या पुस्तकाचे गोखले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. ज्येष्ठ हास्यचित्रकार शि. द. फडणीस, शकुंतला फडणीस, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, चित्रकार रवी मुकुल, प्रकाशक बाळासाहेब कारले, शैलेंद्र कारले, ‘अक्षरधारा’च्या रसिका राठिवडेकर या वेळी उपस्थित होते.
गोखले म्हणाले, ‘‘शकुंतला फडणीस यांचे खरे व साधे लेखन पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात नेऊन पुन:प्रत्ययाचे भान देते.
‘शि. द.’ हे ‘शि. द.’ का आहेत हे त्यातून कळेल. त्यांचे बालपण जिवंत, रसरशीत होते. ताठ कण्याने त्यांनी कष्ट झेलले. त्यांच्या कला आणि बुद्धीचा ज्यांना स्पर्श झाला अशा व्यक्तिमत्त्वांबद्दलही शकुंतला फडणीस यांनी लिहिले आहे.’’
‘फडणिसांच्या चित्रांमध्ये अनावश्यक रेषा नाहीत. त्यांनी चित्रात कधी भडकपणा जाणवू दिला नाही,’ असे फुटाणे यांनी सांगितले. रवी मुकुल म्हणाले,
‘‘आपल्याकडे जाडपणा हे सौंदर्याचे लक्षण मानले जात नाही, पण शि. दं. च्या हास्यचित्रांमधील रेषा जाड व सुंदर आहेत. त्यात सलगता आहे. लोभस रंगसंगतीची ही चित्रे समोरच्याला पटकन समजतात. ‘असे घडले तर,’ हा त्यांच्या चित्रांचा मूलभूत स्वभाव आहे.’’

‘खादी झब्ब्यावरची दाढी अचानक गांगरली!’
रामदास फुटाणे यांनी सध्याच्या विविध घटनांवरील वात्रटिका ऐकवल्या. ज्येष्ठ समाजवादी नेते कुमार सप्तर्षी यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालेल्या सत्काराचा संदर्भ घेऊन फुटाणे यांनी, ‘खादी झब्ब्यावरची दाढी अचानक गांगरली.. आणि गणपतीच्या हातानी भगवी शाल पांघरली,’ अशी कोटी केली आणि प्रेक्षकांनीही त्यांना उत्स्फूर्त दाद दिली.
देशातील सद्यस्थितीवर भाष्य करताना फुटाणे म्हणाले, ‘‘अतिशयोक्ती हा व्यंगाचा गाभा असतो, पण कालचे व्यंग ते आजचे वास्तव म्हणून समोर येत आहे. देशाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. एकीकडे शेतकरी पन्नास हजारांसाठी आत्महत्या करतो आणि दुसरीकडे एखादा उद्योगपती नऊ हजार कोटी बुडवतो. ही यंत्रणा, हे सरकार आणि हा देश नेमका कुणासाठी आहे, असा प्रश्न पडतो. हा ढोंगी आणि मस्तीत चाललेला देश आहे. प्रश्न सुटला की नेता संपतो, त्यामुळे या दोन्ही गोष्टी जिवंत ठेवल्या जातात आणि राजकारण चालू राहते.’’