चौकशीनंतर मोटारचालकाला सोडले

पुणे : शिवसंग्राम पक्षाचे नेते, माजी आमदार विनायक मेटे यांच्या मोटारीचा तीन ऑगस्ट रोजी पाठलाग करण्यात आल्याचा आरोप एका समर्थकाने केल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी एका मोटारचालकास संशयावरुन ताब्यात घेतले. चौकशी करुन त्याला सोडण्यात आले.

विनायक मेटे तीन ऑगस्ट रोजी बीडहून पुण्याकडे येत असताना शिक्रापूरजवळ त्यांच्या वाहनाचा पाठलाग करण्यात आल्याचा आरोप मेटे यांच्या चालकाने केला आहे. चालक आणि मेटे यांच्या एका कार्यकर्त्याचे दूरध्वनीवरील संभाषण समाजमाध्यमात प्रसारित झाले आहे. मेटे यांच्या मोटारीचा पाठलाग करुन धडक देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप चालकाने केला आहे. संशयावरून रांजणगाव पोलिसांनी एका मोटारचालक ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. मेटे यांच्या अपघाताशी त्याचा संबंध आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. मी कामानिमित्त पुण्याकडे जात होता. माझ्या पुढे असलेली मोटार मेटे यांची असल्याची कल्पना नव्हती, असे संशयित चालकाने चौकशीत पोलिसांना सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी दिले.