क्रांतिकारक विष्णु गणेश पिंगळे यांची बलिदान शताब्दी विविध उपक्रमांद्वारे साजरी करण्यात येणार आहे. क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे बलिदान शताब्दी समारोह समितीतर्फे हे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
क्रांतिरत्न विष्णु गणेश पिंगळे बलिदान शताब्दी समारोह समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून पिंगळे यांची बलिदान शताब्दी साजरी करण्यात येईल. या उपक्रमांतर्गत १५ नोव्हेंबर रोजी गोवा मुक्ती संग्रामातील क्रांतिकारक मोहन रानडे यांच्या हस्ते कलश पूजन करून शनिवारवाडय़ावरून रॅलीचा प्रारंभ होणार आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी, चिंचवड, निगडी, तळेगाव दाभाडे, चाकण, राजगुरुनगर, जुन्नर, शिरूर येथील युवक व महिलांचा समावेश असेल. रॅलीतील रथामध्ये पाकिस्तानातील लाहोर येथील रावी नदीचे पवित्र पाणी व माती असेल. त्याचा वापर करून वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तळेगाव ढमढेरे या पिंगळे यांच्या जन्मगावी ‘गदर संग्राम’ आणि ‘भारतीय क्रांतिकारक’ यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात  येणार आहे. या वेळी तळेगाव ढमढेरे येथे पाच हजार युवक ‘गर्जा जयजयकार क्रांतीचा’ या गीताचे समूहगान करतील. पिंगळे हे गदर पार्टीच्या संस्थापकांपैकी एक होते.
विष्णु गणेश पिंगळे यांचा जन्म २ जानेवारी १८८९ रोजी झाला होता. पुढे लाला हरदयाळ, डॉ. खानखोजे यांच्यासोबत ‘गदर पार्टी’ या क्रांतिकारी संघटनेची त्यांनी स्थापना केली. क्रांतिकारक भगतसिंग यांना पिंगळे यांच्याकडूनच क्रांतिकार्याची प्रेरणा मिळाली होती. पिंगळे यांना १६ नोव्हेंबर १९१५ रोजी लाहोरच्या कारागृहात त्यांना फाशी देण्यात आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishnu ganesh pingle revolutionary sacrifice centenary program
First published on: 10-11-2015 at 01:15 IST