विश्रांतवाडी, नगर रस्ता बीआरटी सुरू करण्यासाठी अनेक घोषणा झाल्यानंतर आता १ ऑगस्ट रोजी बीआरटी मार्ग सुरू करण्याची नवी घोषणा गुरुवारी करण्यात आली. या घोषणेनुसार नगर रस्त्यावरील बीआरटी सुरू झाली नाही, तर पीएमपी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असाही इशारा महापौरांनी दिला आहे.
संगमवाडी-विश्रांतवाडी या बीआरटी मार्गाची सुरुवात कधी होणार याबाबत सातत्याने दिनांक घोषित करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र अद्यापही नगर रस्ता व परिसरातील बीआरटी मार्ग सुरू होऊ शकलेले नाहीत. नगर रस्ता बीआरटी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. स्थायी समितीच्या अध्यक्ष अश्विनी कदम, सभागृहनेता शंकर केमसे, आयुक्त कुणाल कुमार, अतिरिक्त नगर अभियंता विवेक खरवडकर, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टीकर, बीआरटी प्रमुख मयूरा शिंदेकर यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
बीआरटी प्रकल्पाची माहिती घेऊन विश्रांतवाडी बीआरटीचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत १ ऑगस्ट रोजी सुरू झाला पाहिजे, असा आदेश महापौरांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिला. बैठकीत महापालिकेच्या आणि पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी आणखी मुदत मागितली. मात्र हे काम बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असून आता आणखी मुदत देता येणार नाही असे महापौरांनी स्पष्ट केले. बीआरटी मार्ग १ ऑगस्ट रोजी सुरू झाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही महापौरांनी बैठकीत सांगितले.
सातारा रस्ता बीआरटी
सातारा रस्त्यावर धनकवडीपर्यंत उड्डाणपूल बांधला जात असून या पुलाखाली बीआरटी मार्ग तयार करण्यात येणार आहे. बैठकीत सातारा रस्त्यावरील या नियोजित बीआरटी मार्गाचाही आढावा घेण्यात आला. या रस्त्यावरील बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी जी कामे करणे आवश्यक आहे ती १९ जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी दिले.