नद्यांना प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आळंदीतील इंद्रायणीसह राज्यभरातील नद्यांवर जलशुद्धीकरण केंद्राचे प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी निर्मिलेला ज्ञानेश्वरी ग्रंथ हा राज्यातील अमूल्य ठेवा आणि वैभव असून तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
अखिल भारतीय वारकरी मंडळ,आळंदी ग्रामस्थ आयोजित आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी प्रेरित ज्ञानेश्वरीच्या ७२५ व्या वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या महापारायण सोहळ्याच्या सांगता प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, भाजपचे राज्य प्रवक्ते माधव भंडारी, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, मारुती महाराज कुऱ्हेकर, रामरावजी महाराज ढोक, आमदार बाळासाहेब मुरकुटे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ.अजित कुलकर्णी, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब महाराज आरफळकर, नीलेश महाराज लोंढे, संयोजक शंकरराव कुऱ्हाडे, संजय घुंडरे, सदानंद महाराज, भास्कर गिरीजी महाराज, आळंदीचे नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, ग्रामीण पोलिस अधीक्षक जय जाधव आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,‘‘नद्यांना आपण मातृतुल्य संबोधतो, मात्र या नद्यांचे आपण प्रदूषण करून नुकसान करीत आहोत. त्यामुळे कधी महापुराच्या तर कधी अवर्षणाच्या माध्यमातून निसर्ग आपल्यावर मात करीत आहे. नद्यांतील पाण्याचा अमृतझरा सतत खळखळत ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आळंदीतील इंद्रायणी नदीसह राज्यातील अनेक नद्यांवर ठीकठिकाणी जलशुध्दीकरण यंत्रणेचे लहान मोठे प्रकल्प भविष्यात उभे करण्यात येणार आहेत.’’
ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरीत समीष्टीचा विचार दिला आहे. निसर्गाच्या संवर्धनाला फार महत्त्व आहे. मानवाने विकासाच्या नावाखाली निसर्गावर मात करीत महापाप केले आहे. त्यावर अतिक्रमण केले आहे. यामुळे अलीकडे अतिवृष्टी, महापूर आदी समस्या निर्माण झाल्या आहेत. नद्यांचे प्रदूषण हे नागरीकरणामुळे वाढत आहे. उद्योगातून केवळ १० टक्के तर शहरीकरणामुळे सुमारे ९० टक्के प्रदूषण होत आहे. शहरातील सांडपाणी आणि घाण थेट नद्यांचे पाणी प्रदूषित करीत आहे. नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून यापुढील काळात प्राधान्य देऊन कामे हाती घ्यावी लागणार आहेत.
वारकरी संस्थांच्या जागेवरील आरक्षणात फेरबदल  
आळंदी शहराच्या विकास आराखडयात वारकरी धर्मशाळा मठ, मंदिर, शिक्षण संस्थांच्या जागा विविध विकास कामांसाठी आरक्षित झाल्या आहेत.वारकरी संस्थांचे जागेवर आरक्षणे अन्यायकारक झाली आहेत. या आराखडय़ात फेरबदल करुन वारकरी संस्थांच्या मूळ उद्देशासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करून अन्याय दूर केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट
मुख्यमंत्री व्यासपीठावर येताच त्यांनी उपस्थितांना अभिवादन केले. श्रींचे प्रतिमा पूजन, ज्ञानेश्वरी ग्रंथ पूजन करून महापारायण सोहळ्याचे सांगता समारंभास सुरुवात झाली. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरास सदिच्छा भेट देऊन श्रींचे दर्शन घेतले. मंदिरात प्रमुख विश्वस्त डॉ.अजित कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला.
ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यात ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनाचे नेतृत्व ज्ञानेश्वर माउली गोरे यांनी केले. सोहळ्यात काल्याचे कीर्तन सेवा रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य वाणीतून झाली. प्रास्ताविक प्रकाश महाराज बोधले यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश लोंढे यांनी केले. आभार राजाभाऊ चोपदार यांनी मानले. संजय घुंडरे यांनी स्वागत केले.