मुदत संपली तरी मतदार यादी तयार होईना; तांत्रिक कारण

आगामी महापालिका निवडणुकीसाठी शहरातील मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्याची राज्य निवडणूक आयोगाने दिलेली मुदत संपुष्टात येऊन दोन दिवस झाले आहेत आणि तरीही महापालिका प्रशासनाला मतदारांची यादी निश्चित करता आलेली नाही. त्याची कबुली महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सोमवारी दिली; पण या विलंबाचे तांत्रिक कारण देत ‘सॉफ्टवेअर’ला जबाबदार धरले आहे. इच्छुक उमेदवारांकडून कालबद्ध आणि अचूक कामकाजाची अपेक्षा ठेवणाऱ्या आयोगाच्या आदेशालाच महापालिका प्रशासनाने एकप्रकारे खो घातल्याचे त्यामुळे स्पष्ट झाले आहे.

महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय मतदारांची प्रारूप यादी तयार करून त्यावर हरकती-सूचना घेण्याचा पहिला टप्पा पूर्ण करायचा होता. हरकती-सूचनांवरील सुनावणीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मतदारांची अंतिम यादी जाहीर करण्यासाठी आयोगाने २१ जानेवारी (शनिवार) ही मुदत दिली होती. महापालिकेची प्रभाग रचना तयार झाल्यानंतरच महापालिका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाच्या मदतीने मतदार यादीचे काम करण्यास सुरुवात केली होती.

प्रारंभी ऑनलाइन पद्धतीने ही यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पाच जानेवारी रोजी विधानसभा मतदारसंघनिहाय यादी जाहीर करण्यात आली होती. ही यादी शहरातील ४१ प्रभागांमध्ये फोडल्यानंतर त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर ९०९ जणांनी हरकती नोंदवल्या होत्या. त्यानंतर तीन दिवसांमध्ये सुनावणीचा टप्पा पूर्ण करून राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे २१ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर केली जाईल, असे महापालिका प्रशासन आणि निवडणूक शाखेकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र हा दावा फोल ठरला आहे. प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर त्यावर हरकती-सूचना मागविण्यात आल्या असल्या तरी हरकतींमुळे नव्याने मतदार नोंदणी अथवा नावे वगळण्यात येणार नव्हती. केवळ हद्दीमधील बदल वा नाव-पत्त्यांमधील चुका दुरुस्त करण्यात येणार होत्या. विलंब झाल्याची कबुली महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आज काम पूर्ण

सोमवारी दुपापर्यंत २९ प्रभागांच्या याद्या अंतिम झाल्या होत्या. उर्वरित याद्या रात्री उशिरापर्यंत अंतिम होतील,’ असे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. तांत्रिक कारणामुळे प्रकाशित यादी करण्यास विलंब झाल्यामुळे मंगळवारी (२४ जानेवारी) संध्याकाळपर्यंत ही यादी संकेतस्थळावर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.