काम पूर्ण करण्याचे निर्देश;  तपशिलात दुरुस्तीची सोय मतदारांनाही उपलब्ध

पुणे : मतदार यादीतील नावांची पडताळणी येत्या १३ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्यात मतदार पडताळणीचे काम सुरू आहे. ११ नोव्हेंबरपासून या कामाला सुरुवात झाली असून १३ फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी बलदेव सिंह यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) तातडीने बैठका घ्याव्यात, राजकीय पक्षांच्या बैठका घेऊन मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या नियुक्त्यांचे प्रमाण वाढवावे अशा सूचना या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.

दरम्यान, या कार्यक्रमांतर्गत मतदारांना वोटर हेल्पलाइन या मोबाइल अ‍ॅपद्वारे तसेच http://www.nvsp.in  या ऑनलाइन प्रणालीद्वारे विविध गोष्टींचा लाभ घेता येणार आहे. वोटर हेल्पलाइन अ‍ॅप मोबाईलमधील प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध आहे. अ‍ॅपमध्ये ई-पिक क्रमांक किंवा मतदारांच्या नावाने मतदार यादीतील नाव शोधल्यानंतर स्वत:च्या तपशिलाची पडताळणी करून योग्य माहिती असल्यास ‘व्हेरिफाय’ करावे. जर मतदारांना स्वत:च्या तपशिलात दुरुस्ती करायची असेल, तर तसा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. एनव्हीएसपी संकेतस्थळावर स्वत:च्या मोबाईल क्रमांकाद्वारे किंवा ई-मेल आयडीद्वारे नोंदणी करावी लागेल. यासाठी मतदाराला त्याचा दहा अंकी ई-पिन क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. हा क्रमांक दिल्यानंतर मतदारांना मतदार यादीत असलेल्या स्वत:च्या तपशिलाची पडताळणी करता येईल.

सर्व माहिती बरोबर असल्यास ‘व्हेरिफाय’ या बटणावर क्लिक केल्यास पडताळणी पूर्ण होणार आहे. मतदार यादीतील तपशिलात काही विसंगती किंवा दुरुस्ती असल्यास दुरुस्ती तपशील जोडून दुरुस्ती करता येईल. या दोन्ही प्रणालींचा वापर करून मतदारांना कुटुंबातील सदस्यांची नावे एकाच यादी भागात आणि एकाच ठिकाणी ठेवण्याबाबत (फॅमिली टॅगिंग रिक्वेस्ट) विनंती करता येईल. मतदारांना मतदान केंद्रावर उपलब्ध असलेल्या सोयींबाबतही अभिप्राय नोंदवता येणार आहे. तसेच कुटुंबातील भावी मतदारांची माहितीही देता येणार असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या युवकांची मतदार नोंदणी करता येणार आहे.

स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याचे आवाहन

या कार्यक्रमांतर्गत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन योग्य ओळखपत्र आणि कागदपत्रांच्या पुराव्याची प्रत सादर करून मतदार तपशील प्रमाणीकरण करण्यासाठी पुढे यावे. मतदार पडताळणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन मतदार यादीचे पुनर्परीक्षण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत दुबार नाव असल्यास, स्थलांतर झाले असल्यास किंवा कुटुंबातील व्यक्ती मयत झाली असल्यास नाव वगळण्यासाठी अर्ज क्र. सात भरून देता येईल, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत यांनी दिली.