चिन्मय पाटणकर
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या ‘ऊर्जा’ या उपक्रमाअंतर्गत ‘रामजी आएंगे’ या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी पुणेकर प्रेक्षकांना मिळणार आहे. रामायण आणि वेटिंग फॉर गोदो यांच्या मिलाफातून ही नाटय़कृती घडली आहे.
कोणताही काळ, कोणतेही ठिकाण, कोणत्याही व्यक्तिरेखांना एका अवकाशात आणून त्यांना नवा आयाम देणं, त्यातल्या नाटय़ाची विविध अंगानं उकल करणं हे रंगभूमीचं अन्य माध्यमांपेक्षा असलेलं वेगळेपण.. या प्रयोगशीलतेतूनच अत्यंत विलक्षण नाटय़कृती साकारतात. ‘रामजी आएंगे’ ही नाटय़कृती त्यासाठीच वेगळी ठरते. रामायणातले किष्किंधा कांड आणि नाटककार सॅम्युएल बेकेटचं गाजलेले ‘वेटिंग फॉर गोदो’ यांचा मिलाफ घडवून ही नवी नाटय़कृती साकारली आहे. या नाटकाचा प्रयोग पाहण्याची संधी २७ जुलैला सायंकाळी सात वाजता सुदर्शन रंगमंच इथं मिळेल.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे ऊर्जा उपक्रम गेल्या काही काळापासून सुरू करण्यात आला आहे. त्यात पुण्याबाहेरच्या नाटय़संस्थांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित केले जातात. अनेक नाटय़संस्थांना पुण्यात प्रयोग करण्याची इच्छा असते. पण आर्थिक कारणांनी ते शक्य होत नाही. ही उणीव दूर करून वेगळ्या जाणिवांची नाटकं पुणेकर प्रेक्षकांना पाहता यावीत, यासाठी महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे या नाटय़संस्थांना पुण्यात प्रयोग करण्यासाठी आमंत्रित केलं जातं. आतापर्यंत काही संस्थांना या ऊर्जा उपक्रमाअंतर्गत प्रयोग करण्याची संधी मिळाली. त्यात मुंबईच्या ‘बेताल’ या संस्थेची
निर्मिती असलेल्या ‘रामजी आएंगे’ या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. अभिनव ग्रोव्हरनं लेखन आणि दिग्दर्शन केलेल्या या नाटकात कौस्तव सिन्हा, कर्तव्य शर्मा, करणज्योत सिंग, रॉबिन सिंग, अभिनव ग्रोव्हर यांच्या भूमिका आहेत.
भोपू आणि पिपी हे दोन वानर किष्किंधा पर्वतावर कोणाची तरी वाट पाहात बसले आहेत. त्यांचा राजा बंदर राजाला हटवण्यात आल्यानंतर तिथं आता माणसांचे राज्य आहे. स्वाभाविकच त्यांच्या राज्यात अस्वस्थता आहे. भोपू आणि पिपी वाट पाहात असतानाच अन्य तिघांना भेटतात, त्यांच्याशी बोलतात. पण ते ज्यांची वाट पाहात असतात, ती व्यक्ती येते का, त्यांची प्रतीक्षा संपते का यावर हे नाटक बेतलं आहे. रामायणातला एक काळ आणि वेटिंग फॉर गोदो या गाजलेल्या नाटकाचे मूळ कथानक यांना एकमेकांमध्ये गुंफून त्यांना नवा आयाम देण्याचा, नवे नाटय़ शोधण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अभिनव ग्रोव्हरनं या नाटकात केला आहे.
‘नाटक शिकत असताना वेटिंग फॉर गोदो अभ्यासाला होतं. पण तेव्हा ते खूप कठीण वाटत होतं, काही कळत नव्हतं. तरीही ते डोक्यात राहिलं. काही काळाने यक्षगान शिकायला कर्नाटकात गेलो असताना यक्षगानाच्या एका नाटकात सीतेला वानरांनी शोधण्याचा एक प्रसंग होता. त्यात वाट पाहणारे वानर एकमेकांशी बोलतात असा एक प्रसंग खूप धमाल पद्धतीने करण्यात आला होता. ते मला खूप रंजक वाटलं. त्यानंतर पुराण, इतिहास, वर्तमान एकमेकांमध्ये मिसळून काही नवीन घडवता येईल अशी कल्पना सुचली. त्यामुळे वेटिंग फॉर गोदो आणि किष्किंधा कांड यांचा मिलाफ केला. त्या दोन्हीचे काळ, संदर्भ वेगळे असले, तरी आम्ही ‘रामजी आएंगे’ नाटक करताना काही वेगळ्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे या नाटकात अब्सर्डिटी आणि उपरोध यांचा वापर करून समकालीन संदर्भावर भाष्य केलं आहे,’ असं अभिनवनं सांगितलं.