पुण्यात महिनाभरात दोन इमारतींच्या भिंती कोसळून निष्पाप मजुरांचा मृत्यू झाला. या घटना मागे पडत नाहीत तोच धनकवडी गावठाण या ठिकाणी असलेल्या सावरकर चौकात एका घरासमोरची भिंत कोसळली. या घटनेत एक महिला घरामध्ये अडकली होती तिची अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धनकवडी या ठिकाणी सावरकर चौकात भिंत कोसळली होती. संपूर्ण भिंत कोसळल्याने एक महिला बंद घरात अडकून पडली होती. खिडकीचे ग्रील कापून या महिलेची सुटका करण्यात आली.

दरम्यान घराच्या बाजूला उभ्या असलेल्या काही दुचाकींचेही नुकसान झाल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात भिंत कोसळण्याच्या घटना घडून त्यामध्ये निष्पापांचा जीव गेला आहे. मुंबईतही धोकादायक इमारत कोसळून लोकांचा जीव गेला. पावसाळ्याआधी सगळी व्यवस्था नीट केल्याचे प्रशासनाचे दावे किती फोल ठरतात हेच या घटना अधोरेखित करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.