पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांची चाळण होऊनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या २६ अभियंत्यांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापुढे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाईचा इशारा शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिला आहे. दरम्यान, मे, जून आणि जुलै या तीन महिन्यांत शहरातील रस्त्यांवर तीन हजार खड्डे पडले आहेत.

महापालिकेने यावर्षीपासून खड्डे व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. या अंतर्गत ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ हे ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे खड्ड्यांची तक्रार नोंदवणे आणि त्या तक्रारींचे निराकरण करण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली. असे असताना ॲपवरील तक्रारींकडेही कनिष्ठ अभियंते दुर्लक्ष करत हाेते. खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणे, नियमानुसार आणि खड्डे बुजविताना दर्जा न ठेवणाऱ्या २६ कनिष्ठ अभियंत्यांना शहर अभियंता मकरंद निकम यांनी कारणे दाखवा नाेटीस बजावत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले हाेते.

त्यानंतर सर्व अभियंत्यांनी खुलासा सादर केला आहे. ॲपमध्ये छायाचित्र समाविष्ट न हाेणे, स्थापत्य विभागात नव्याने बदली झाल्याने ॲपला लाॅगिन नसणे यांसह विविध तांत्रिक समस्या असल्याबाबत अभियंत्यांनी लेखी खुलाशामध्ये म्हटले आहे. अभियंत्यांचे लेखी खुलासे मान्य करीत यापुढे खड्डे बुजविण्याच्या कामामध्ये कुचराई तसेच ‘पॉटहोल मॅनेजमेंट’ ॲपवरील तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा शहर अभियंत्यांनी दिला आहे.

रस्त्यांची चाळण

शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर मे ते २९ जुलैअखेर दाेन हजार ८९८ खड्डे पडले आहेत. रस्त्यांची चाळण झाली आहे. बुजविलेल्या खड्यांपैकी डांबर, काेल्ड मिक्सने ८५६, खडीने २११, जीएसबीने ६७२, पेव्हिंग ब्लाॅकने १६७, सिमेंट काँक्रीटने ३२१ अशा दोन हजार २२७ खड्ड्यांची दुरुस्ती केली. सद्य:स्थितीत शहरात केवळ ६७१ खड्डे असल्याचा दावा महापालिका प्रशासनाचा आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खोदाई सुरूच

शहरात पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज, स्थापत्य, शहरी दळणवळण, स्मार्ट सिटी, इतर काही विभागांकडून तसेच, महामेट्रोकडून रस्ते व पदपथ खोदकाम पावसाळ्यातही सुरूच आहे. त्यामुळे खड्ड्यात भर पडत आहे. निगडी ते पिंपरी मार्गावर जलवाहिनी आणि मेट्रोच्या कामासाठी दोन्ही बाजूने खोदाई केली जात आहे. खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या २६ अभियंत्यांचा लेखी खुलासा प्राप्त झाला. त्यांना सक्त ताकीद देण्यात आली असून यापुढे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष केल्यास कडक कारवाई केली जाणार आहे, शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.