शहरातील पाणीटंचाईमुळे बेकायदेशीर नळजोड तोडणे, वॉशिंग सेंटरवर कारवाई, पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर र्निबध अशा विविध उपाययोजना महापालिका प्रशासनातर्फे हाती घेण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी गेल्या चार दिवसांत पावणेचारशे बेकायदेशीर नळजोड तोडले असले, तरी बेकायदेशीर नळजोड अधिकारी आणि नगरसेवकांच्याच आशीर्वादाने दिले जात असल्यामुळे फक्त टंचाईच्या काळात त्यांच्यावर अल्पशी कारवाई केली जाते ही या कारवाईमागची वस्तुस्थिती आहे.
एक दिवसाआड पाणी पुरवठय़ामुळे शहरात पाणी वाचवण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. त्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बांधकामे आणि जलतरण तलाव तसेच वॉशिंग सेंटर बंद करण्यात आली आहेत. त्या बरोबरच बेकायदेशीर नळजोडांवरही धडक कारवाई सुरू असल्याचे सांगितले जात असून चार दिवसात पावणेचारशे नळजोड तोडण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तसेच चौतीस वॉशिंग सेंटरवरही कारवाई करण्यात आली असून दीडशे ठिकाणची पाणीगळती थांबवण्यात आली आहे. हे आकडे ऐकून महापालिका अधिकाऱ्यांना नेमके याच काळात बेकायदेशीर नळजोड कसे सापडले असा प्रश्न आता विचारला जात आहे. तसेच अनेक वॉशिंग सेंटरही बारा महिने महापालिकेच्या पाण्यावरच सुरू असतात. मग त्यांच्यावर इतरवेळी कारवाई का केली जात नाही, असाही प्रश्न विचारला जात आहे.
बेकायदेशीर नळजोड स्थानिक नगरसेवकांच्या सक्रिय पुढाकाराने आणि कर्मचारी-अधिकाऱ्यांच्याच आशीर्वादाने दिले जात असल्यामुळे असे नळजोड इतरवेळी सापडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शहरातील बहुसंख्य नगरसेवक नळजोड देण्याची कामे सर्रास करतात आणि अनेकदा महापालिकेच्या कोणत्याही यंत्रणेला त्याचा पत्ता लागू न देता ही कामे हातोहात उरकली जातात. बहुतेकवेळा रात्री तसेच महापालिकेला शनिवार, रविवार अशी जोडून सुटी आली की ही कामे जोरात असतात. नगरसेवकांच्या कार्यालयात नळजोड देणारी चार-पाच जणांची टीम नेहमीच तयार असते. त्यात एक प्लंबर असतो आणि नळजोड घेण्यासाठी जी इतर अनुषंगिक कामे करावी लागतात ती करण्यासाठी अन्य दोघे-तिघे असतात. रस्त्याच्या कडेने जेथून पाण्याची मुख्य वाहिनी गेलेली असते तिला टॅप मारून नवा पाईप जोडला जातो आणि त्या पाईपद्वारे हव्या त्या ठिकाणी नळजोड दिला जातो.
कोणताही नागरिक नगरसेवकाकडे पाण्याची तक्रार घेऊन गेला आणि त्याने नळजोड मागितला की त्याला नळजोड घेण्यासाठीच्या संपूर्ण पॅकेजचा आकडा सांगितला जातो. दोन, तीन हजारापासून पंचवीस हजारापर्यंत रक्कम आकारली जाते. नागरिकाची तेवढे सगळे पैसे देण्याची तयारी नसली तर पाईप, नळ तसेच अन्य जे साहित्य लागेल ते तुम्ही आणून द्या, असा पर्याय दिला जातो.
आतापर्यंत काय काय…
पावणेचारशे बेकायदेशीर नळजोड तोडले
चौतीस वॉशिंग सेंटरवर कारवाई
दीडशे ठिकाणची पाणी गळती थांबवली