सध्या राज्यात बहुतांश सगळीकडेच पाऊस पुरेसा न झाल्याने पाणीटंचाई आहे अशा परिस्थितीत पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. त्या हेतूने नॅनो गणेश एम टू एम तंत्रज्ञान (मोबाइल टू मशिन) हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्याच्या मदतीने तुम्ही बाहेरगावी असलात तरी तुमच्या सोसायटीतील पाण्याच्या टाकीची पातळी मोबाइलवर बघू शकता. सध्याच्या ऑटोमेटिक कंट्रोल (स्वनियंत्रण) यंत्रणेपेक्षा यात पाण्याची गळती कळू शकते, कारण एखादा नळ चालू असेल तर तुमची पाण्याची टाकी भरणारच नाही व ते मोबाइलवर बसल्या बसल्या कळू शकेल. विशेष म्हणजे कितीही उंचावरच्या टाकीत किती पाणी आहे हे खाली बसून कळू शकेल. सोसायटीतील सुरक्षा कर्मचारीही हे तंत्रज्ञान वापरून ही पातळी जाणून घेऊ शकतील व त्यामुळे पाणी वाया जाणार नाही.
पुण्याचे संतोष ओसवाल व राजश्री ओसवाल या अभियंता दाम्पत्याने ही यंत्रणा तयार केली असून, त्यांनी नॅनो गणेश यंत्रणा आधी ग्रामीण भागात वापरली. त्यात मोबाइलच्या मदतीने शेतातील पंप चालू बंद करण्यासाठी यंत्रणा तयार केली होती. त्याच दूरनियंत्रक यंत्राची ही शहरी भागासाठीची आवृत्ती आहे. फक्त यात मशिन टू मोबाइल व मोबाइल टू मशिन अशा दोन्ही प्रकारे संदेशवहन होणार आहे. त्यासाठी वायरची गरज नाही. पाण्याच्या टाकीत सेन्सर म्हणजे संवेदक टाकलेले असतील. त्यांच्या वायर्स नॅनो गणेश यंत्राला जोडलेल्या असतील. पाणी जसे भरेल त्याप्रमाणे संवेदकाकडून संदेश यंत्राकडे येतील. या यंत्रात चांगली सेवा असलेल्या कंपनीचे सिमकार्ड बसवलेले असेल, त्यामुळे त्याचा नंबर तुमच्या मोबाइलवर फिरवला तर तुम्हाला टाकीत किती पाणी आहे हे समजू शकेल. ही यंत्रे पाच हजार ते २५ हजार रु. किमतीस उपलब्ध अाहेत.(स्वयंचलित) प्रगत यंत्रात पाण्याची टाकी भरल्यावर पाणीपुरवठा व पंप आपोआप बंद करता येईल. नेहमीच्या ऑटो कंट्रोलरमध्ये (स्वनियंत्रकात) टाकीतील पाणी भरले की पंप बंद होतो, पण एखादा नळ चालू राहिला असेल तर टाकी भरतच नाही. नॅनो गणेश एम टू एम तंत्रात ते कळणार आहे, कारण विशिष्ट काळात पाण्याची विशिष्ट पातळी गाठली गेली नाहीतर मोबाइलवर लगेच कळेल. यात वीज, पैसा व पाणी या गोष्टींची बचत होणार आहे. नवउद्योजकांना हे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल. शिवाय या यंत्रणेच्या निगा व दुरुस्तीच्या कामातून दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल. धंदा करण्यापेक्षा यात सामाजिक उद्योजकतेचा भाग अधिक आहे असे ओसवाल यांनी सांगितले. सरकारी कार्यालये, कंपन्यांचे सामाजिक सेवा जबाबदारी विभाग, शैक्षणिक संस्था, दूरसंचार कंपन्या व गणेश मंडळे यांनी यात पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. स्कील इंडिया, मेक इन इंडिया, मेड फॉर इंडिया, डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी अशा सर्व संकल्पनांचा समावेश या तंत्रज्ञानात आहे. नवउद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठीही ओसवाल हे मार्गदर्शन करणार आहेत. नागपूर जिल्हय़ात ही यंत्रणा पथदर्शी स्वरूपात चालू केली आहे. info@nanoganesh.com या संकेतस्थळावर याची माहिती उपलब्ध आहे. यापूर्वी नॅनो गणेश उपकरणाने खेडय़ातील अडीच लाख लोकांचे जीवन बदलून टाकले आहे. त्या भागात ३० हजार यंत्रे विकली गेली आहेत. ओसवाल यांना नोकियाचा इनोव्हेटिव्ह यूज ऑफ मोबाइल हा पुरस्कार मिळाला असून, एकूण १२ पुरस्कार मिळाले आहेत.

नॅनो गणेश एम टू एम घटक
* नॅनो गणेश उपकरण.
* चांगली सेवा असलेल्या कंपनीचे सिमकार्ड (पॅक टाकलेला असणे आवश्यक.)
साधा मोबाइल.

पाण्याची गळती
अनेकदा सार्वजनिक इमारती, खासगी सोसायटय़ा येथे पाण्याच्या मोटारी चालू राहतात व पाणीही चालू राहते त्यामुळे ते वाया जाते. ५ अश्वशक्तीची मोटार १ मिनिट जास्त चालू राहिली तर ३०० ते ५०० लीटर पाणी वाया जाते. त्यात २५-३० जणांचे स्नान होऊ शकते. किंबहुना आपण पाच लीटर पाणी पितो असे गृहीत धरले तर १०० जणांच्या तोंडचे पाणी आपण वाया घालवत असतो. शिवाय वीज व त्यासाठी लागणारा पैसाही वाया जात असतो. अगदी टँकरपासून सर्व ठिकाणी पाणी वाचवण्यासाठी नॅनो गणेश एम टू एम तंत्रज्ञानाची गरज आहे.