पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवार (२८ जून) पासून शहरात एक वेळ पाणीपुरवठा केला जाईल. महापालिकेत झालेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शहरात बारा टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.
महापौर चंचला कोद्रे यांनी गुरुवारी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. पाणीकपात, उपलब्ध पाणी पुरवून वापरणे आणि पाण्याचा गैरवापर टाळणे यासाठी ठोस निर्णय घेणे आवश्यक झाल्यामुळे महापौरांनी सर्व महापालिका पदाधिकारी आणि गटनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला. उपमहापौर सुनील ऊर्फ बंडू गायकवाड, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, सभागृहनेता सुभाष जगताप, विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे, तसेच वसंत मोरे, गणेश बीडकर, अशोक हरणावळ हे गटनेते तसेच पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी व अन्य वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या १.९३ टीएमसी इतका पाणीसाठा असून पाणीगळती तसेच बाष्पीभवन वगैरेचा विचार करता उपयुक्त साठा १.०८ टीएमसी इतकाच आहे. गेल्या वर्षी याच दिनांकाला ५.१३ टीएमसी पाणीसाठा होता. या परिस्थितीचा विचार करून शहरात बारा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून संपूर्ण शहराला यापुढे एक वेळ पाणी दिले जाईल. सध्या शहरासाठी रोज १२५० दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. कपातीनंतर आता ११०० दशलक्ष लिटर पाणी मिळेल, असे महापौरांनी सांगितले. शहरातील ७६ प्रभागांपैकी ३४ प्रभागांमध्ये दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. या प्रभागांमध्ये आता एक वेळ पाणी दिले जाईल. उर्वरित भागांमध्ये एक वेळच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथे वेगळी पाणीकपात केली जाणार नाही.
खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार धरणांमधून गेल्या १ जुलैपासून शहराला १७ टीएमसी तर शेतीसाठी सात टीएमसी पाणी देण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना पिण्याचे जे पाणी दिले गेले, ते दोन टीएमसी इतके असून दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होते, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांनी या वेळी दिली. पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी देखील उपाययोजना सुरू करण्यात आल्या असून गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. विशेषत: बांधकामांच्या ठिकाणी पिण्याचे पाणी वापरले जाऊ नये, तसेच गाडय़ा धुण्याच्या व्यवसायासाठी देखील पिण्याचे पाणी वापरले जाऊ नये, याची तपासणी केली जाणार आहे. पाण्याचा गैरवापर आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
महापालिकेतील निर्णय
शहरात शनिवारपासून एक वेळ पाणी
बारा टक्के पाणीकपात
बांधकामांना पिण्याचे पाणी नाही
पाण्याचा गैरवापर आढळल्यास तातडीने कारवाई

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onपीएमसीPMC
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply deduction pmc dam rain
First published on: 27-06-2014 at 03:40 IST