खडकवासला धरणातून दौंडसाठी पाणी सोडण्याची मागणी होत असताना विविध प्रश्न व शंका उपस्थित केल्या जात आहेत. दौंडच्या साठवण तलावाच्या क्षमतेपेक्षा दहापट अधिक पाण्याची मागणी केली जात आहे. त्याचप्रमाणे कालव्यानेच पाणी सोडण्याबाबतच्या मागणीबाबतही शंका घेतली जात आहे. त्यामुळे दौंडला खरंच पिण्याला पाणी हवे असेल, तर ते रेल्वेने पाठविण्याचा पर्याय योग्य ठरेल, असे मत व्यक्त होत असून, सजग नागरी मंचने सोमवारी पुन्हा पालकमंत्री गिरीश बापट यांना पत्र लिहून विविध प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.
दौंडच्या साठवण तलावाची क्षमता ४५ कोटी लिटरची म्हणजेच ०.०४५ टीएमसी (अब्ज घनफूट) पाण्याची आहे. दौंडसाठी मागणी मात्र ०.५ टीएमसीची करण्यात आली आहे. सद्य:स्थितीमध्ये दौंडचा साठवण तलाव अध्र्यापेक्षा खाली आहे. फेब्रुवारीमध्ये कालव्यातून शेवटचे पाणी सोडण्यात आले होते. त्यातून तलाव भरून घेण्यात आला होता. तलाव भरल्यानंतर पावणेतीन महिने पाण्याचा साठा टिकतो. सध्या हा तलाव अर्धा भरला तरी जूनच्या अखेपर्यंत नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळू शकते. असे असतानाही दहापट अधिक पाण्याची मागणी कशासाठी होते आहे, असा प्रश्न सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.
जून २०१५ ते फेब्रुवारी २०१६ पर्यंत चारवेळा पाणी सोडण्यात आले. चारवेळा मिळून एकूण ५.५० टीएमसी पाणी दौंडसाठी धरणातून सोडण्यात आले. एकूण ०.२ टीएमसी पाणी पिण्यासाठी तलावात गेले. त्यामुळे गळती वगळता उरलेले पाणी गेले कुठे, हा प्रश्नही अनुत्तरित असल्याचे वेलणकर यांनी स्पष्ट केले. पाण्याचा हिशेब मिळत नसल्याने दौंडला आता पिण्यासाठी पाणी हवे असल्यास ०.०३ टीएमसी पाणी लागेल तसे रेल्वेने पाठविता येईल. पुणेकरांना पाण्याचा हिशेब विचारणाऱ्या गिरीश बापट यांनी दौंडला पाठविलेल्या पाण्याबाबतचा खुलासा त्यांनाही विचारावा, अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water supply for daund
First published on: 26-04-2016 at 03:27 IST