पाणीटंचाईमुळे शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला असून टँकरचालकांकडून केल्या जाणाऱ्या गैरप्रकारांनाही लगाम घालण्याच्या योजना महापालिकेतर्फे आखण्यात येत आहेत. या योजनेचा एक भाग म्हणून महापालिकेकडून पाणी घेणाऱ्या सर्व टँकरचालकांना त्यांच्या टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी आता सहा दिवसांची मुदत आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे धरणांमध्ये अद्यापही नव्याने पाणीसाठा सुरू झालेला नाही. त्यामुळे शहरात सोमवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठय़ामुळे टँकरची मागणी वाढणार असून ही मागणी लक्षात घेऊन संभाव्य गैरप्रकार टाळण्यासाठी टँकरचालकांना त्यांच्या टँकरवर ग्लोबल पोजिशनिंग सिस्टिम (जीपीएस) ही यंत्रणा बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. त्यासाठी टँकरचालकांना २१ जुलै ही मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर ज्या टँकरवर ही यंत्रणा नसेल, त्यांना महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवरून पाणी दिले जाणार नाही, असेही कळवण्यात आले आहे.
 महापालिका स्वत:च्या टँकरमार्फत शहराच्या विविध भागात पाणी पुरवते. तसेच खासगी टँकरचालकही नागरिकांना पाणी पुरवण्याची व्यवस्था करतात. महापालिकेतर्फे सुमारे दीडशे टँकरचालकांना पालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवरून पाणी दिले जाते. तसेच महापालिका ठेकेदारांकडून टँकर घेऊन त्यामार्फतही पाणी पुरवते. शहरात सात ठिकाणी महापालिकेची टँकर भरून देण्याची व्यवस्था आहे. टँकरचालकांकडून अनेकदा पाण्याची चोरी, जादा पैसे आकारणी यासह अनेक गैरप्रकार होतात. अनेकदा पालिका हद्दीच्या बाहेरही या पाण्याची विक्री केली जाते. राजकीय दबावातूनही टँकरची पळवापळवी केली जाते तसेच दिलेल्या भागात पाणी न पोहोचवता खोटय़ा नोंदी करून पाणी अन्य भागात पोहोचवले जाते. त्यावर उपाय म्हणून खासगी टँकरवर जीपीएस यंत्रणा बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसा आदेशही पाणीपुरवठा विभागाने काढला आहे. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रातही टँकर भरताना गैरप्रकार होतात. काही ठिकाणी मीटर नसल्यामुळे किती पाणी घेतले गेले यावरही या यंत्रणेमुळे नियंत्रण आणणे शक्य होणार आहे.
आदेशामुळे काय होईल?
या यंत्रणेमुळे महापालिकेच्या कोणत्या भरणा केंद्रावर टँकर भरला गेला तसेच तो कोणत्या ठिकाणी पोहोचवणे आवश्यक होते, कोणत्या मार्गाने त्या ठिकाणी टँकर पोहोचला, किती वाजता पोहोचला, तो किती वेळात मोकळा करण्यात आला याची माहिती समजणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Water tanker gps supply pmc
First published on: 15-07-2014 at 03:25 IST